आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रधनुष्याचा स्वीकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझा मुलगा आता गुन्हेगार नाही’ असं लिहिलेली पाटी हातात घेऊन वडील उभे आणि आईने मुलाच्या गालावर ओठ टेकवले आहेत. हा फोटो आणि सोबतचं लिखाण गेल्या गुरुवारपासून तुम्हा अनेकांनी वाचलं असेल कदाचित. मुंबईतल्या अर्णब नंदी या १८ वर्षांच्या मुलाची ही ‘कमिंग आउट’ची म्हणजे, वेगळ्या लैंगिकतेची व्यक्ती असल्याचं उघडपणे सांगणारी पोस्ट. सर्वोच्च न्यायालयाने संमतीसह ठेवलेले समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही, असा निर्णय दिल्यानंतर अर्णबने त्याच्या ‘मन की बात’ जगासमोर ठेवली. त्याच्यात हे धाडस येण्याचं १०० टक्के कारण होतं न्यायालयाचा हा निर्णय, आणि निर्णय देताना पाचही न्यायाधीशांनी वापरलेले शब्द. मी हा अाहे असा आहे, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी धैर्य गोळा करावं लागण्यासारखं दुर्दैव नाही खरं तर. परंतु अनेक वर्षांपासूनच्या धारणा, धर्मातल्या कळणाऱ्या/न कळणाऱ्या समजुती, समाजमनावर पगडा असणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होणारी मतं, यांमुळे एकविसाव्या शतकाची दोन दशकं उलटायला अाली तरी ही परिस्थिती आहे हे वास्तव. 


मी समलिंगी आहे, हे प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडलांनाही सांगण्याचं बळ शेकडो लोकांकडे नाही, याचं एक कारण याविषयी असलेलं प्रचंड अज्ञान, माहितीचा अभाव हेही आहे. समलैंगिक असणं, मुलीने मुलीवर/मुलाने मुलावर प्रेम करणं, ति/त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवणं म्हणजे काय हे आजही अनेकांना नीटसं ठाऊक नाही. पण तरुण पिढी याविषयी खूप वाचतेय, शास्त्रीय माहिती करून घेतेय, आपल्या मित्रपरिवारात असं गोंधळलेलं कोणी असेल तर त्या व्यक्तीला सांभाळून घेतेय, जन्मत: मिळालेलं स्त्री वा पुरुष हे लेबल ज्यांना नकोसं वाटतंय, त्यांना सावरतेय, आधार देतेय, त्यांची बाजू घेऊन लढतेय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं त्यांना कायद्याचं पाठबळ मिळालंय त्यामुळे ही मंडळी खूष आहे. आता आईवडलांनी, या मुलांच्या घरच्या मोठ्यांना पुढचं पाऊल उचलायचंय. फार मोठं नाही काही, फक्त आपलं या मुलांवरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही. त्यांचा स्वीकार करायचाय, हे म्हणणंही खरं तर चुकीचं आहे, कारण आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना नाकारण्याचाच प्रश्न नसावा. 


आपल्या लैंगिकतेविषयी गोंधळलेल्या, कसं बोलू, कुणाला सांगू अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या वाचक मित्रमैत्रिणींना एकच सांगणं, मोकळेपणाने बोलता येईल, समजून घेईल अशी व्यक्ती शोधून तिच्याशी बोलत राहा, हेल्पलाइन उपलब्ध आहेत त्यावर फोन करा, संवाद सुरू ठेवा. आता कायद्याची भीती उरलेली नाही.

- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...