आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅट सीटवरची मानसिकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केबीसीवर मागच्या आठवड्यात प. बंगालच्या आसनसोल जिल्ह्यातला एक गरीब आणि अधू मुलगा हाॅट सीटवर होता. त्याच्या दोन्ही पायांचे तळवे आतल्या बाजूला वळलेले आहेत, त्यामुळे तो बूट घालू शकत नाही. याची लहानपणापासून वाटणारी खंत त्याने दोनतीनदा बोलून दाखवली. इथे जे पैसे जिंकेन, त्यातनं पायाचं आॅपरेशन करणार, बूट घालणार आणि अख्खं आसनसोल हिंडून काढणार असं त्याचं स्वप्न. चारही हेल्पलाइन वापरून तो २५ लाखांपर्यंत पोहोचला होता. हे उत्तर चुकलं तर त्याला फक्त ३.२० लाख रुपये मिळणार होते. उत्तर माहीत नाही हे मान्य करून खेळ सोडला तर १२.५० लाख. जयप्रकाश नारायणांचं चरित्र कोणी लिहिलंय, असा प्रश्न होता. उत्तराबद्दल १०० टक्के खात्री नसतानाही त्याने उत्तर दिलं आणि ते चुकलं.


त्याच्या आधी बीडमधल्या एक बाई आल्या होत्या. भाड्याच्या छोट्या घरात मूल वाढवायचं नाही म्हणून तिने कर्ज काढून छोटा फ्लॅट विकत घेतलेला. नोकरीही साधीशी होती. तिनेही खात्री नसताना उत्तर देऊन साडेबारा लाखांवर पाणी सोडलं आणि ३.२० लाख रुपये घेऊन घरी गेली.


या दोघांनाही पैशाची अतिशय गरज होती, हे स्पष्ट होतं. केबीसीमध्ये अनेकदा आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले लोकही येतात, त्यांच्यासाठी पैसे जिंकण्यापेक्षा अमिताभला भेटणं वा हाॅट सीटवर बसणं अधिक महत्त्वाचं असतं. या दोघांनाही तेच अधिक हवंहवंसं वाटलेलं असू शकेल. पण खात्री नसताना दिलेलं उत्तर चुकल्याने, नऊ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचं प्रेक्षकांनाही वाईट वाटतंच. हे सगळं आधीच माहीत असतं, अमिताभ सतत आठवण करून देत असतो, त्यामुळे अधिक खंत वाटते.


या बिनधास्त वागण्यामागची मानसिकता काय असते? मोह, स्वत:वरचा जादा विश्वास, इथवर नशिबाने साथ दिलीय पुढेही देईल, अशी खात्री की आणखी काही? दोष नाही द्यायचा या स्पर्धकांना अजिबात हं. त्या वेळी प्रत्यक्ष हाॅट सीटवर बसलेलं असताना मेंदू काय करेल, हे सांगता येत नाही, हेही खरंच की.

- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...