आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान माझी भावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारण मध्यमवर्गीय भारतीय घरांमध्ये बार्बीचं आगमन ऐंशीनव्वदच्या दशकात झालं असावं, मुलींच्या खेळण्यात बाहुल्या तर काही शतकांपासून होत्याच. शिडशिडीत, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची ही बार्बी भारतीयच नव्हे तर जगभरातल्या मुलींची लाडकी होती. अमेरिकेतून इकडे आलेल्या आणि मुलींना वेड लावणाऱ्या या बाहुलीला गेल्या आठवड्यात तब्बल 60 वर्षं पूर्ण झालीत. बार्बीचं वैशिष्ट्य म्हणजे या साठ वर्षांत ती सतत चर्चेत राहिली, बातम्यांचा विषय झाली, टीकेची धनी झाली, संशोधनाचा विषय झाली. एका आईने आपल्या मुलीला खेळायला छान बाहुली हवी, या हेतूने 9 मार्च 1959 रोजी जिचा जन्म झाला ती बार्बी होती गोरी, स्विमसूटमधली, सोनेरी केसांचा पोनीटेल बांधलेली आणि हातात काळा चष्मा घेतलेली. ती लोकप्रिय झाली इतकंच नव्हे तर ती जगभरातल्या मुलींच्या लहानपणाचा एक अविभाज्य भाग बनली. मग ती हळूहळू डाॅक्टर, नर्स, फॅशन एडिटर असे वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या रूपात आली. कालांतराने केन हा तिचा मित्र बाजारपेठांत आला. त्या दोघांचं ड्रीमहाउस आलं, म्हणजे खेळघर आलं. बार्बी जरी लहान मुलींसाठी बाहुली असली तरी ती प्रौढ व्यक्तीच्या रूपात होती. तिचं शरीर त्या वेळच्या सौंदर्याच्या परिमाणांमध्ये बसणारं होतं, किंवा असंही म्हणता येईल की बार्बीसारखं ‘प्रमाणबद्ध’ शरीर हळूहळू तरुण मुलींना हवं झालं. स्त्रीवादी चळवळीने अर्थात यावर टीका केली. तशीच टीका झाली ती तिच्या गोरं असण्यावर. 


जन्माला आल्यानंतर 21 वर्षांनी, 1980 मध्ये पहिली कृष्णवर्णीय बार्बी बाजारात आली. आजच्या घडीला बार्बी घ्यायची तर ती सात रंगांची त्वचा, 22 रंगांचे डोळे, आणि २४ केशभूषा इतकी विविध रूपांमध्ये आहे. गेल्या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून खऱ्याखुऱ्या जगातल्या तीन कर्तबगार महिलांच्या रूपात बार्बी आली, त्यात होती चित्रकार फ्रीडा काहलो, गणिती कॅथरीन जाॅन्सन, आणि वैमानिक अमेलिया इअरहार्ट. यंदा भारतीय जिम्नास्ट दीपा कर्मकार आणि पर्यायाने तिची स्फूर्तिदायक कहाणी बार्बीच्या रूपात जगभर पोचणार आहे. 


लहान माझी भावली पण मोठी तिची सावली, हे बालगीत बार्बीला चपखल लागू पडतं, ते याचमुळे.


मृण्मयी रानडे  मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...