Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about gender and technology

जेंडर आणि तंत्रज्ञान

मृण्मयी रानडे | Update - Aug 07, 2018, 06:46 AM IST

अात्यंतिक गरीब व्यक्ती वगळता टीव्ही आणि मोबाइल न बाळगणारी माणसं जरा विरळाच.

 • Mrinmayee Ranade writes about gender and technology

  आजची कव्हर स्टोरी आणि वरचा लेख, दोन्हींचे विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचे. टीव्ही आणि त्यावरच्या मालिका, मग त्या कोणत्याही भाषेतल्या का असेनात; आणि मोबाइल/स्मार्टफोन. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आपसूक आलेली ही दोन उपकरणं. अात्यंतिक गरीब व्यक्ती वगळता टीव्ही आणि मोबाइल न बाळगणारी माणसं जरा विरळाच. दोन्ही संपर्काची साधनं. टीव्ही एकमार्गी, तर फोनमुळे संवाद वा संभाषण होऊ शकतं हा एक फरक. पण दोहोंतली साम्यं पुष्कळच. व्यसन हे सर्वात मोठं कदाचित. दोन्ही उपकरणं मनुष्यप्राण्यासाठी वरदान आहेत, याबाबतही दुमत नसावं. आणि वरदान म्हटल्यावर शापही वाटावा, यात नवल ते काय? अनेक पिढ्यांपासून शाळेत “अमुकतमुक - शाप की वरदान?’ या विषयावर निबंध लिहून घेतले जातात, त्यात हे दोन मुद्दे.


  तंत्रज्ञानाला जेंडर नसतं, पण वापरकर्त्याला असतं. मग ही दोन तांत्रिक उपकरणं कोण वापरतं, यावर ती शाप की वरदान हे ठरवलं जातं, असं मानायला वाव आहे. उदाहरणार्थ, बायका सारख्या टीव्ही बघतात, त्यातल्या मालिका पाहून फॅशनी करतात, आपापल्या घरांत तशा कटकारस्थानी वागायला लागतात, टीव्ही पाहण्यात खूप वेळ घालवतात, वगैरे वगैरे आरोप अनेक वर्षांपासून होत आले आहेत. भले पुरुष तितकाच, किंबहुना जास्तच, टीव्ही पाहात असला तरी. पण बायकांना घरची कामं जास्त असतात, पुरुषांना तितकी नसतात, त्यामुळे त्यांनी टीव्ही पाहण्यात वेळ घालवलेला चालतो, असं काही गणित आहे की काय? मालिका पाहणाऱ्या पुरुषांची संख्याही चिक्कार आहे, अशी आमची आतली खबर आहे.


  हेच मोबाइलच्या वापराला लागू होतंय. मुलींनी स्मार्टफोन वापरू नयेत, नाहीतर त्या प्रेमात पडून भरकटतात आणि पळून जाऊन लग्न करतात, म्हणे. त्या ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात ती व्यक्ती स्मार्टफोनशिवायच हे करत असते, असा समज अाहे अनेकांचा. पुरुषांना आपापले फोन आई, बायको, बहीण, मुलगी, मैत्रीण यांच्या हातात सोपवायला सांगितले, काहीही डिलिट न मारता, तर कितीजण मान्य करतील, हा प्रश्न विचारायचीही आवश्यकता नाही, इतकं त्याचं उत्तर स्पष्ट आहे. का, तेही आपल्याला माहीत आहे. पुरुषच ते, लागतंच त्यांना तसलं सगळं मनोरंजनासाठी, म्हणे. तरीही मुलींनी, बायांनी टीव्ही आणि फोनपासून दूर राहावं, असं कानावर येतंच असतंय. हे कोण म्हणत असतं, ते काही मोठ्याने सांगायला नकोच.

  - मृण्मयी रानडे, मुंबई
  mrinmayee.r@dbcorp.in

Trending