आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाॅरवर्डचं दुष्टचक्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या व्हाॅट्सअॅपवर, फेसबुकवर मीटू या मोहिमेवरचे अनेक विनोद आलेले असतील. आपली पहिली प्रतिक्रिया अर्थात हसण्याचीच असते. विनोद फारच आवडला तर अनेक जण तो फाॅरवर्डही करतात. क्वचित असं होतं की, एखादा विनोद वाचून हसू तर येत नाहीच, पण त्यामागची मानसिकता काय असेल असा प्रश्न मनात उत्पन्न होतो. बलात्कार या शब्दावरनं एका अत्यंत गाजलेल्या चित्रपटातला विनोद याच वर्गातला. विनोद आहे, सोडून द्या, इतका काय त्यावर विचार करायचा, आयुष्य इतकं गंभीरपणे नसतं घ्यायचं वगैरे मुद्दे ज्या व्यक्ती तक्रार करतात, किंवा आक्षेप घेतात, त्यांच्यासमोर मांडले जातात. पण जेव्हा असे विनोद सतत सोशल मीडियातनं लोकांच्या समोर येतात, ते सारखे सारखे शेअर केले जातात, तेव्हा मूळ घटनाच विनोदाने घेण्याजोगी आहे, असा संदेश नकळत लोकांपर्यंत पोचत असतो. आधीच बलात्कार, लैंगिक हिंसाचार, छेडछाड, या गोष्टी समाज म्हणून आपण फार गांभीर्याने घेत नाही. अशी तक्रार करणाऱ्या स्त्रीवरच दोषारोप करणारे आपण, तू तिथे गेलीसच कशाला, असेच कपडे का घातलेस, तूच ओढवून घेतलं असशील, असं तिच्यावरच उलटवणारे. मग असे विनोद वाचले की या समजुती आणखीनच दृढ होतात. जे लोक याकडे विनोद म्हणूनच पाहतात, त्यांना मुलींचा पाठलाग करणं, मागे लागणं, छेडछाड करणं, छळणं यात वावगं वाटत नाही. या सगळ्या कृती ओके आहेत, असाच संदेश या विनोदांमुळे त्यांच्यापर्यंत पोचत असतो. दुसऱ्या बाजूला, मीटूचं उदाहरण घ्यायचं तर, असे विनोद वाचले की ज्या व्यक्तींनी हे भोगलेलं असतं, ज्या तक्रार करण्याची हिंमत जुळवत असतात, त्यांना वाटतं की नकोच ते. आपल्याही तक्रारींवर असे विनोद होतील. आधीच बाॅलिवूडमुळे असा (गैर)समज मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे, अनेक वर्षांपासून, की एखाद्या मुलीच्या सतत मागे लागलं की ती तुमच्या प्रेमात पडणारच. त्यात अशा विनोदांची भर पडते.


मुक्ता जोशी या ठाण्यातल्या तरुण सायकाॅलाॅजिस्टने फेसबुकवर हा संदेश दिला आहे. जी व्यक्ती असा विनोद फाॅरवर्ड करते ती माझ्या अनुभवाकडे गांभीर्याने पाहू शकणार नाही, असं मुलींना वा अशा प्रकरणात त्रास झालेल्या व्यक्तींना वाटू शकतं, हे ती तिला आलेल्या व्यावसायिक अनुभवांतनं म्हणतेय.

 

आपण याचा विचार कधी करणार आहोत?
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...