आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या कव्हर स्टोरीतील अरीथा फ्रँकलिन यांच्या ‘रिस्पेक्ट’ या गाण्यावरनं आठवण झाली ती आपल्याकडच्या चळवळीच्या गाण्यांची. अशी गाणी जी चळवळीसाठी म्हणून लिहिलेली नसतात, ज्या एरवी निव्वळ कविता असतात, परंतु चळवळीच्या एखाद्या टप्प्यात ती इतकी चपखल बसतात की, त्यांचं चळवळीबाहेरचं अस्तित्वच धूसर व्हावं. दया पवार यांची ही कविता अशीच
‘बाई मी धरण धरण बांधिते
माझं मरण मरण कांडिते’
कविता लिहिल्यानंतर काही वर्षांनी ती स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव आंदोलन, इतर काही चळवळींमध्ये समूहगीतासारखी वापरली गेली. म्हटलं तर बांधकाम करणाऱ्या मजूर स्त्रीची व्यथा मांडणारी ही कविता.
‘दिस कासऱ्याला जीव मग घोटाळला,
तान्हं लेकरू, माझं लेकरू,
पाठी खाली मी डालते...’
पण अर्थात कोणत्याही स्त्रीला ती आपलीशी वाटावी अशी. नोकरी/मजुरी करणाऱ्या वा घर चालवणाऱ्या. त्यामुळे या चळवळींनी ही कविता आपलीशी केली, सुरेल चालीसह, तेव्हा ती हजारो स्त्रियांच्या मुखी वसलीच जणू.
‘नया दौर’ या हिंदी चित्रपटातलं ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा, मिल कर बोझ उठाना’ हे गाणंही असंच. सगळ्यांनी मिळून काम करू, एकटा माणूस थकून जाईल, असं सांगणारं हे गाणंही अनेक संघटनांमध्ये गायलं जातं. संघटना या शब्दांतच एकत्र येणं आहे, त्यामुळे हे गाणं तिथे योग्यच वाटतं.
‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं चळवळीतलं किंवा चळवळींचं नाही. ते लिहिलं गेलं १९६२च्या युद्धातील पराजयाचं दु:ख हलकं करण्यासाठी, त्या युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजिलेल्या खास कार्यक्रमासाठी. पण १९६३पासून आजतागायत एकही प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्य दिन या गाण्याशिवाय साजरा झालेला नाही. ते गाणं जणू भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्यांसाठीच लिहिलं गेलं होतं. हे गाणं ऐकताना डोळ्यांत पाणी न तरळणाऱ्या व्यक्ती विरळाच असाव्यात, इतकं ते सर्व भारतीयांना स्पर्शून जातं.
काहीच गाण्यांच्या नशिबात अशी शब्दातीत लोकप्रियता येते.
- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.