आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्पर्श

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुन्हा एकदा स्त्रिया आणि मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आलाय - शबरीमला यात्रेच्या निमित्ताने. (शबरी मलय असं मूळ नाव, शबरीचा पर्वत. ती शबरी अस्पर्शच होती असा विचार केला तर आश्चर्य नको वाटायला या सगळ्या वादाचं खरं म्हणजे!) प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे, पण न्यायालयाचा आदेश मानायचा नाही असं देवस्थानाने तर ठरवलं आहेच, पण केरळातील मोठा वर्गही स्त्रियांनी मंदिरात येऊ नये, यावर हटून बसला आहे. भले राज्य सरकारला न्यायालयाचा निर्णय मान्य असला तरी. प्रसंगी, हिंसाचारावरही उतरायला भक्तगण तयार आहेत, दोन पत्रकार महिलांना मंदिराच्या पायऱ्यांपासून मागे फिरावं लागलंय. त्यांची हेल्मेट आणि संरक्षक कवच घातलेली छायाचित्रं पाहिलीच असाल. ते पाहून संदर्भ माहीत नसणाऱ्यांना वाटू शकेल की, त्या युद्धाचं वा दंगलीचं वार्तांकन करायला गेल्या असतील. पण मंदिर परिसरात सध्या दंगलसदृशच वातावरण आहे. ज्या केरळात दोनच महिन्यांपूर्वी पावसाने आणि पुराने हाहाकार उडवला होता, त्याच केरळात आता महिला आणि मंदिर प्रवेश या निमित्ताने एक वेगळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. याला अर्थात राजकीय रंग आहेच. पण तूर्तास तो बाजूला ठेवू.


या वादाच्या निमित्ताने समाजातही तट पडलेत. एक आहे, परंपरा कशाला मोडायची बुवा, चालत आलंय अनेक वर्षं ते चालत राहू द्यावं की. ज्यांनी कोणी हा नियम केला त्यांनी काही विचारांतीच तो घेतला असेल ना. वगैरे वगैरे. दुसरा आहे, गेल्या बायका मंदिरात तर काय बिघडतं पुरुषांचं? तिसरा आहे, बायकांना आपल्या घटनेने समानतेचा हक्क दिला आहे, कोठेही जाण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे, मंदिरात प्रवेश नाकारणं म्हणजे हा मूलभूत हक्क नाकारणं आहे, त्यामुळे प्रवेश मिळालाच पाहिजे. चौथं मत असं आहे की, हाजीअलीच्या गाभाऱ्यातही नाही महिलांना प्रवेश, त्याबद्दल का नाही बोलत तुम्ही? पाचवं मत असं आहे की, नाही गेल्या बायका मंदिरात तर काय बिघडतं? ज्या धर्माच्या आधारे तुम्हाला मंदिरात येण्यापासून अडवलं जातंय, त्या धर्माच्या बंधनात किती काळ अडकून राहायचंय, बायांनो? 
या पाच मतांवर चर्चा कराच घरात, शाळेत, महाविद्यालयात, कार्यालयात. आणखीही मतं कळतील कदाचित. आणि त्यानंतर तुमचं मत काय आहे, ते आम्हाला जरूर कळवा.


मृण्मयी रानडे- मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...