Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about traditional foods

खादाड स्मृती

मृण्मयी रानडे, मुंबई | Update - Aug 28, 2018, 12:32 AM IST

देशविदेशातील बातम्या, लेख वाचताना बऱ्याचदा काहीतरी छान हाती लागतं. म्हणजे नुसतं माहितीपूर्ण नव्हे, तर जगण्याविषयीच्या आप

 • Mrinmayee Ranade writes about traditional foods

  देशविदेशातील बातम्या, लेख वाचताना बऱ्याचदा काहीतरी छान हाती लागतं. म्हणजे नुसतं माहितीपूर्ण नव्हे, तर जगण्याविषयीच्या आपल्या कक्षा विस्तारायला मदत होईल असं काही. ते नेहमीच आनंद देणारं असंही नव्हे, कधी प्रचंड अस्वस्थही करून जाणाऱ्या असतात या बातम्या, बातम्यांमधल्या गोष्टी. एक व्हिडिओ ब्लाॅग नुकता पाहण्यात आला, पास्ता ग्रॅनीज नावाचा. म्हणजे पास्ता आजीबाई. आपल्याकडे जशी पोळी किंवा भाकरी अनेक वर्षांपासून केली जाते, कदाचित शेकडोही. तसाच पास्ता हा इटालियन पदार्थ. त्याचे अनेक प्रकार आहेत, आपल्याला दोनतीनच माहीत असतात सर्वसाधारणपणे. तर असा पास्ता करण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत, ज्या आता लुप्त होत चाललेल्या आहेत.


  एका ब्रिटिश बाईला हे कुतूहल वाटलं, आणि ती अशा इटालियन आजीबाईंच्या शोधात निघाली ज्या असा वेगवेगळा पास्ता बनवू शकतात. तिला जे सापडलं ते तिने या ब्लाॅगवर शेअर केलंय. ऐंशीच्या पुढच्या टुकटुकीत म्हाताऱ्या, क्वचित त्यांना मदत करणारे तितकेच टवटवीत त्यांचे म्हातारे नवरे आपापल्या स्वयंपाकघरात वेगवेगळा पास्ता करताना पाहणं हा अद्भुत अनुभव आहे, थेट जुन्या काळात नेणारा. कारण हा पास्ता हाताने लाटलेला आहे, आपण बाजारातनं विकत आणतो तसा यंत्रात केलेला नव्हे. ते पाहून आपल्याला शेंगोळ्या, शेवया, करंज्या, वगैरे आठवल्या नाहीत तरच नवल. तेही करण्याचं कौशल्य जरा मागे पडू लागलंय की काय, असं वाटावं.


  खाण्याशी, पदार्थांशी, स्वादाशी, गंधाशी आपल्या अनेक स्मृती जोडलेल्या असतात. अशी एखादी आठवण आपल्याकडे आहे, हेही अनेकदा माहीत नसतं. परंतु एखाद्या विशिष्ट पदार्थामुळे वा गंधामुळे ती आठवण अचानक डोकं वर काढते. बहुतेक वेळा ती आई, आजी, काकीमामीमावशीआत्या यांच्यापर्यंत पोचणारी असते. आजीने केलेल्या पदार्थाची चव माझ्या हातात नाही, अशी लाडिक तक्रार अनेक व्यक्ती करत असतात, बऱ्याचदा ती खरीही असते. सध्याचा ट्रेंड असा आहे की, अशी आठवण करून देणारे पदार्थ करून पाहायचे. त्या पदार्थाची आठवण पुढच्या पिढीसाठी तयार करायची. सोशल मीडियामुळे अनेक जुन्या पाककृतींना, पदार्थांना अशी संजीवनी मिळाली आहे, याबाबत दुमत नसावं. यातूनच आजच्या कव्हर स्टोरीची कल्पना घेतली आहे. त्यासोबत दिलेल्या आठवणी आणि पदार्थ तुमच्याही मनात अशा खादाड स्मृती जागवतील, याची खात्री वाटते.

  - मृण्मयी रानडे, मुंबई

  mrinmayee.r@dbcorp.in

Trending