Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about women Asiad winners

खेळकन्या

मृण्मयी रानडे, मुंबई | Update - Sep 04, 2018, 05:29 AM IST

इंडोनेशियात जकार्ता आणि पालेमबांग येथे सुरू असलेल्या अाशियाई स्पर्धा दोन दिवसांपूर्वीच संपल्या.

 • Mrinmayee Ranade writes about women Asiad winners

  इंडोनेशियात जकार्ता आणि पालेमबांग येथे सुरू असलेल्या अाशियाई स्पर्धा दोन दिवसांपूर्वीच संपल्या. त्यात भारताची कामगिरी २०१४च्या इंचाॅन आशियाई स्पर्धांपेक्षा चांगली झाली आहे, आणि यात महिला क्रीडापटूंचा मोठा सहभाग आहे. हेप्टॅथलाॅनमध्ये सुवर्णपदक मिळवणारी सपना बर्मन असो की, ४ X ४०० रिले धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण मिळवणाऱ्या चौघी; हार्मोन्सच्या गडबडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही त्यावर मात करून रौप्यपदक मिळवणारी धावपटू दुती चंद असो की, नेमबाजीत सुवर्ण मिळवणारी राही सरनोबत; एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवणारी अपूर्वी चंदेला असो की, फ्रीस्टाइल कुस्तीत रौप्य मिळवणारी विनेश फोगट; वुशुमध्ये कांस्य मिळवणारी रोशिबिना देवी असो की, रौप्यपदक मिळवणाऱ्या कबड्डी संघातल्या खेळाडू; या प्रत्येकीची संघर्षाची, जिद्दीची, अपार मेहनतीची कहाणी रोमांचक आणि स्फूर्तीदायक आहे.


  हेप्टॅथलाॅनमधल्या सात खेळांमध्ये अव्वल येणाऱ्या सपनाचे वडील सायकल रिक्षा चालवतात. स्पर्धेच्या आदल्या दिवशी तिचा दात प्रचंड दुखू लागला, इतक्या वेदना होत होत्या की खेळता येतं की नाही, अशी भीती तिला वाटत होती. पण ती भीतीवर मात करून, गालावर वेदनाशामक औषधाचा पॅच लावून खेळली आणि चक्क सुवर्णपदक जिंकली. सपनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दोन्ही पायांना सहा बोटं आहेत त्यामुळे तिला खास तयार करून घेतलेले बूट वापरावे लागतात. दुतीच्या संघर्षाच्या, अपमानाच्या, जिद्दीच्या बातम्या आपण गेली काही वर्षं वाचत आलो आहोतच. राही सरनोबतचं नाव गेली काही वर्षं बातम्यांमधनं झळकत असतंच, परंतु आशियाई स्पर्धेतलं यंदाचं यश खासच म्हणायला हवं. हिमा दासने नुकतंच जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं, आशियाई स्पर्धांमध्ये ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. पुरुष व महिला दोन्ही संघांचं हाॅकीतलं सुवर्णपदक मात्र हुकलं, याची रुखरुख राहील. विनेश ही ‘दंगल’फेम फोगत बहिणींची चुलतबहीण, तिने घरातली कुस्तीतील आंतरराष्ट्रीय यशाची परंपरा राखली.


  पदक मिळवणाऱ्या सर्वच खेळाडूंचं कौतुक आहे. परंतु या मुलींचं कांकणभर अधिक. कारण, भारतासारख्या मुलींना दुय्यम मानणाऱ्या, नकुशा म्हणणाऱ्या, मुलींना पोटातच मारून टाकणाऱ्या, शाळेतही न पाठवणाऱ्या देशात जन्माला येऊन त्यांनी इतकं यश मिळवलं आहे. स्वप्न पाहायचं धाडस दाखवलंय आणि ते पूर्ण करण्यासाठी जिवापाड मेहनत घेतलीय. त्यासाठी त्यांच्या आईवडलांनीही जिवाचं रान केलंय, बोटं दाखवणाऱ्या समाजाला थोपवून धरलंय.
  सध्या खेळत असलेल्या, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा बाळगणाऱ्या, झळाळत्या यशाची स्वप्नं पाहणाऱ्या सर्वच क्रीडापटूंना खूप शुभेच्छा.

  - मृण्मयी रानडे, मुंबई
  mrinmayee.r@dbcorp.in

Trending