आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाभासी वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या पानावर प्रीवेडिंग शूटसारख्या हौशी, खर्चिक, नि काहीशा निरुपयोगी वाटणाऱ्या ट्रेंडबद्दल लेख आणि पान उघडल्यावर, येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल वर्णन करणारा लेख, असे वरकरणी विरोधाभासी वाटणारे विषय आजच्या अंकात आहेत. तुळशीचं लग्न झालं की माणसांच्या लग्नांचे मुहूर्त निघतात, म्हणजे आजपासून विवाहसमारंभांची धूम सुरू होणार. या नवराबायकोंपैकी अनेक जणांनी त्यांचे प्रीवेडिंग फोटो वा व्हिडिओ केले असण्याची शक्यता आहे, आणि ही संख्या वाढत जाणार आहे असं निरीक्षणातनं जाणवतंय.

 

या फोटोंमधनं त्यांना सांगायची असते त्यांच्या लग्नापर्यंतच्या प्रवासाची गोष्ट. लग्न करताना ते एकदाच होणार असं गृहीत धरलेलं असल्याने हा दिवस वा हा विधि अविस्मरणीय व्हावा, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मग काहीतरी वेगळं करायचं ठरवून विविध संकल्पनांच्या भोवती फोटो काढले जातात. तसं तर वैशिष्ट्यपूर्ण लग्नसमारंभ पूर्वीपासून होत आले आहेत.

 

विमानात, भर समुद्रात, उंच सुळक्यावर, वगैरे. बाॅलिवूडमुळे डेस्टिनेशन वेडिंग चर्चेत आलीत. सगळा हौशीचा मामला. जितका पैसा खिशात त्यानुसार या उड्या मारल्या जातात. या सगळ्याविषयी मतमतांतरं जरूर अाहेत, सध्या काय दिसतंय तेवढं मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय.

 
त्याचबरोबर सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही अनेक भागांत हे दिसतंय की, पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवणार आहे. अगदी १९७२च्या दुष्काळापेक्षा परिस्थिती भीषण असणार आहे, गावांमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता आहे, माणसांसोबत गुरांचे, पशुपक्ष्यांचे हाल होणार आहेत, असा अंदाज आता नोव्हेंबरातच असणाऱ्या अपुऱ्या पाणीसाठ्यावरून करता येतोय.

 

एक कारण यंदा पाऊस पुरेसा झालेला नाही. परंतु, जो झाला त्यातलं किती पाणी आपण भविष्यासाठी साठवून ठेवू शकलोय, रेनवाॅटर हार्वेस्टिंग केलंय का, पाणी जपून वापरलंय का, वृक्षतोड किती केलीय, किती पाणी वाया घालवलंय या प्रश्नांच्या उत्तरांतही दुष्काळ का पडेल, याचं उत्तर मिळू शकेल. हा दुष्काळ पहिला नाही, परंतु आपण आधीच्या अनुभवांवरनं शिकण्यात कमी पडतोय, हे नक्की.खर्चिक लग्न हे एक वास्तव, तर दुष्काळाची निश्चित चाहूल हे दुसरं. दोन्हींची संगती लावणं कठीण आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 

बातम्या आणखी आहेत...