आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कूछ तो गडबड है....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"सीआयडी' ही पोलिसी रहस्यकथांवर बेतलेली लोकप्रिय मालिका. एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया, अभिजित, डॉ. सालुंके या त्यातल्या लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखा. तब्बल वीस वर्षं या सिरियलने प्रेक्षकांना गुंगवून ठेवलं आणि गेल्या आठवड्यात "सीआयडी'चं प्रक्षेपण थांबणार अशी बातमी आली. सिरियलच्या कट्टर चाहत्यांना मोठाच धक्का बसला. पाठोपाठ "सीआयडी'च्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा झाली. प्रेक्षकांमधलं व्यक्तिरेखांविषयीचं प्रेम उफाळून आलं. पण, दोन दशकं "सीआयडी'ने गारूड केलं कसं, याचा शोध घेणारा हा लेख...

 

ज्याला गूढकथांचं आकर्षण नाही, ज्याला रहस्याचा उलगडा होत असताना थरार अनुभवता येत नाही, असा प्रेक्षक विरळा. पण म्हणून सगळ्याच रहस्य वा गूढकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवतातच असंही नाही. सोनी टीव्हीवरच्या ‘सीआयडी’ नावाच्या पोलिसी रहस्य वा साहसकथा या धाटणीच्या सिरियलने मात्र या प्रेक्षकांना एक-दोन नव्हे, तर तब्बल वीस वर्षं खिळवून ठेवण्याचा चमत्कार साधला आहे. आता ‘सीआयडी’चं पुरतं गारूड झालं असताना सिरियल तात्पुरती का होईना ऑफएअर होतेय म्हटल्यावर "सीआयडी'मय झालेल्या प्रेक्षकांना जबर धक्काही बसला आहे.


ते ही साहजिकच आहे. "सीआयडी'मधली प्रत्येक व्यक्तिरेखा एव्हाना चाहत्या प्रेक्षकांच्या घरातली एक होऊन गेली आहे, त्यामुळे अचानक ही आपली माणसं दिसणार नाहीत, या विचारांतून भावनावेगी धक्का बसणं समजून घेण्यासारखं आहे. ‘सीआयडी’ १९९८ पासून टेलिकास्ट होत राहिली. प्रत्येक टप्प्यावर सिरियलला नवा प्रेक्षक मिळत गेला. कित्येक घरांत "सीआयडी' सुरू होताच इतर वेळी चुळबुळ करणारं पोरं स्तब्ध झालं. आतुरतेनं वाट पाहणारे वयोवृद्ध प्रेक्षक सिरियल सुरू होताच एकाच जागी खिळून राहिले. पोराटोरांच्या, वयोवृद्धांच्या मुखी एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया, इन्स्पेक्टर अभिजित, डॉ. सालुंके ही नावं येत राहिली. त्यांचे कारनामे कर्णोपकर्णी होत गेले आणि ‘सीआयडी’ सिरियलला ‘कल्ट स्टेट्स’ येत गेलं. यथावकाश व्यक्तिरेखांच्या बोलण्यातले शब्द, वाक्यं ‘फेमस डायलॉग’ बनत गेले.
एरवी, रहस्यकथांचा किंवा त्यातल्या व्यक्तिरेखांचा एक ठराविक साचा असतो. बहुतांशी रहस्यकथांमधल्या व्यक्तिरेखा या एक तर खूप खुनशी किंवा खूप भडक तरी असतात. ‘कोल्ड ब्लडेडनेस’ हा त्यांच्या स्वभावाचा गुणविशेष असतो.

 

परंतु ‘सीआयडी’मधल्या एकूण एक व्यक्तिरेखेला लेखक-दिग्दर्शकाने वेगवेगळे रंग, छटा दिल्या आहेत. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा माणसाच्या पातळीवर आलेल्या आहेत. त्यांचे भिन्न स्वभाव, त्यातून निर्माण होणारे तणाव, विनोद, धसमुसळेपणा हे सारं रहस्यकथांना मनोरंजनाची झालर देणारं आहे. म्हणजे ‘सीआयडी’ सिरियलमध्ये अत्यंंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास चाललेला असला तरीही, पात्रांच्या स्वभावामुळे निर्माण होणारे हलके-फुलके क्षण प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवणारे आहेत. कथांना जिवंतपणा देणारे आहे. हाच ‘ह्युमननेस’ "सीआयडी'च्या यशाचं मोठं रहस्यही आहे आणि युनिक सेलिंग पॉइंटसुद्धा. याचमुळे इतरही देशी-विदेशी चॅनेल्सवर सहस्यकथाधारित सिरियल सुरू असताना प्रेक्षकांनी "सीआयडी'ला अंतर दिलं नाही.


अनप्रेडिक्टिबिलिटी अर्थात अनाकलनीयता हा कुठल्याही रहस्यकथेचा प्राण असतो. मात्र, त्याचाही एक साचा ठरलेला असतो. "सीआयडी'मध्ये तोही साचा मोडला गेला. म्हणजे, एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया किंवा डॉ. तारिका हे रूढार्थाने नायक-नायिका या वर्गात मोडणारे असले तरीही अशा अनेक कथा गुंफल्या गेल्यात ज्यात यातल्या अनेकांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण होऊन सिरियलला धक्कादायक वळणं मिळाली आहेत. प्रेक्षकांच्या मेंदूला झिणझिण्या आणण्यात लेखक-दिग्दर्शकाला एकदा नव्हे, अनेकदा यश आलंय.

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यातलं हे धक्कातंत्र ‘सीआयडी’च्या बाबतीत हमखास यशस्वी ठरत आलं आहे. व्यक्तिरेखा आकारास येणं, त्या रुजणं, प्रस्थापित होणं आणि प्रस्थापित झाल्यानंतर फुलत-बहरत जाणं ही एक दीर्घ पण अविरत प्रक्रिया ‘सीआयडी’मधल्या बहुतेक सगळ्या पात्रांच्या बाबतीत आजवर घडत आली आहे. व्यक्तिरेखांची देहबोली, आवाज, आवाजातले चढउतार आणि त्यातून साधला जाणारा परिणाम यातून प्रेक्षकांशी नाते तयार होत जाते. व्यक्तिरेखांनी म्हटलेले संवाद धडाकेबाज नसले तरीही आपलेसे वाटू लागतात, तोंडी रुळू लागतात. आणि त्यातून लोकप्रियतेचा कळस गाठला जातो, हे सारं ‘सीआयडी’च्या बाबतीत घडलं आहे. म्हणजे, ‘कुछ तो गडबड है’ या संवादात किंवा ‘दया, दरवाजा तोड दो’ या आदेशात धमाकेबाज असं काहीही नाही, तरीही ज्या संदर्भात हे संवाद म्हटले जातात, ज्या शैलीत ते म्हटले जातात, त्याने अकल्पित असा परिणाम साधला जातो.


सातत्य आणि प्रवाहीपण हीसुद्धा ‘सीआयडी’ची चटकन नजरेत भरणारी वैशिष्ट्यं आहेत. हे सातत्य आणि प्रवाहीपण जसं नट-नट्यांच्या अभिनयात आहे, तसंच ते लेखक दिग्दर्शकाच्या सादरीकरणातही आहे. पण या प्रवाहीपणाला ‘सोनी टीव्ही’च्या निर्णयाने सध्या तरी आडकाठी आणल्याचं दिसतंय. मनोरंजनाचे अगणित पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध असताना हा म्हटला तर सिरियलकर्त्यांसाठी धोक्याचा क्षणही आहे.


सीआयडी ही मालिका १९९८मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्या अर्थाने टेलिव्हिजनवर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली ही एकमेव मालिका ठरावी. एसीपी प्रद्युम्नचे हातवारे, दयाची सणसणीत थोबाडीत मारण्याची स्टाइल, वेंधळ्या फ्रेडरिकचे भाबडे प्रश्न, टीमचे कुगल सर्च इंजिनवर माहिती शोधणे या आणि अशा अनेक कारणांसाठी ही मालिका अविस्मरणीय ठरली. ‘कुछ तो गडबड है', ‘दया, दरवाजा तोड दो', ‘तुम्हे तो फासी होगी, फासी', ‘इसका मतलब समझे दया' यांसारखे संवाद प्रचंड गाजले. या सगळ्यामुळे शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, दिनेश फडणीस, श्रद्धा मुसळे आदी कलाकारांंनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यश मिळवलेे.


"सीआयडी' ही आजवर प्रदीर्घ काळ टीव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका. सीआयडीचे जगभरात चाहते असल्याने आज या मालिकेचे अनेक फॅनपेजेस आहेत. या मालिकेने अंदाजे १५५१ भाग पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल म्हणजेच २७ ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ही मालिका थांबणार असल्याचे समजताच चाहत्यांच्या वतीने ट्विटरवर ‘सेव्ह सीआयडी' असा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला.


खरे तर याआधीसुद्धा "सीआयडी' काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. २०१६मध्ये अंदाजे एक महिन्यासाठी मालिकेचे प्रसारण थांबवण्यात आले होते. मात्र, या वेळी "सीआयडी' मालिका संपणार असल्याची बातमी बाहेर येताच "सीआयडी'च्या कट्टर चाहत्यांचा हिरमोड झाला. आश्चर्य म्हणजे, सिरियल थांबवण्याच्या निर्णयाचा जेवढा प्रेक्षकांना धक्का बसला तेवढाच किंवा त्याहून अधिक धक्का एसीपी प्रद्युम्न ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शिवाजी साटमांसारख्या कलाकारांना बसला. त्यांचे म्हणणे हे सारे धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्हाला याची कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना मिळालेली नाही. लगोलग सोनी वाहिनीने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये स्पष्टीकरण देताना ते लिहितात, ‘या मालिकेने २० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. फायरवर्क्स प्रॉडक्शनसोबतचा आजवरचा आमचा प्रवास खूप छान होता. सीआयडी ही मालिका २८ ऑक्टोबरनंतर काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे. या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आजवर प्रेक्षकांनी पाहिलेल्या भागांपेक्षा अधिक थरारक भाग प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहेत. या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये आणखी गुंतागुंतीच्या केसेस दाखवल्या जाणार आहेत.' येत्या दोन-तीन महिन्यांत ही मालिका पुन्हा सुरू होईल, असे म्हटले जात आहे. नवीन पर्वात नवे चेहरे दिसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे सगळंच खरं ठरो, हीच कलावंत आणि प्रेक्षक अशी दोहोंची या क्षणी अपेक्षा असणार हे उघड आहे.

 

- मृण्मयी नातू

mrinmayi.natu@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...