आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीदाक्षिण्याची ऐशीतैशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृणाल पाटील  

महिलांचे स्थान, महिलांचे प्रश्न, महिलांची प्रगती आणि महिलांची क्षमता... चावून चोथा झालेले हे विषय. तरीही त्याची तीव्रता बदलत नाही हाच आपला पराभव आहे.
समाजातले महिलांचे स्थान आणि त्यांची अवस्था यावर अनेकदा चर्चा होतात. एखाद्या सोहळ्याच्या औचित्याने  तिच्या शक्तीचा गौरव केला जातो, तिच्या कामाची दखल घेतली जाते. आजची महिला किती सक्षम झाली यावर मोठा ऊहापोह केला जातो. हे खरं ती ‘चूल आणि मूल’ यापलीकडे स्त्रियांचे क्षेत्र विस्तारण्यासाठी भारतातील कित्येक समाजसुधारकांनी जिवाचे रान केले. त्यांच्या मेहनतीमुळे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले. त्यास तिने आपल्या कर्तृत्वाने अधिक चमक दिली. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला नवीन दिशा दिली. काही क्षेत्रांत तर ती पुरुषांच्या पुढेही गेली. धर्माच्या आणि परंपरेच्या बंधनातूनही मुक्त होऊ लागली. धर्माच्या नावावर मिळणाऱ्या धमक्या पचवू लागली. त्या परंपरांचीच पुनर्मांडणी करायलाही ती आता शिकली आहे. तरीही, तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही निकोप नाही.भोवताली घडणाऱ्या अनंत घटना याचाच पुरावा देतात. स्त्रीसामर्थ्याचा गाजावाजा ही नाण्याची एक बाजू तर नाही ना, असा प्रश्न पडतो. महिला म्हणून तिची घुसमट वाढताना दिसते. आजही घराघरातल्या स्त्रीचा छळ बंद झाला नाही. हुंड्यासाठी तिला जाळून मारले जाते, प्रेमाच्या नावाने छळले जाते. आईच्या गर्भात मुली सुरक्षित नाहीत, रस्त्यावरही नाहीत. तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू बघणारे महाभाग आजही भोवती वावरत आहेत. घरात, कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागते. म्हणजे, स्त्रीमुक्ती किंवा स्त्री सक्षमीकरण हा केवळ आभासच मानायचा का? प्रचंड प्रतिभा आणि कार्यशक्तीच्या जोरावर त्या पुढे जात राहतात. मात्र, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच राहतो. दरवर्षी अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्यांच्या घटना पुढे येतात. प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवतो. भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महत्त्वाचे स्थान दिले. ‘मातृदेवो भव’ चा संदेश दिला. अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमाने इतिहासाची पाने रंगवली. प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जिवावर अनेक क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, तरीही समाजाची पुरुषी मानसिकता अजून बदलायला तयार नाही. परंपरा आणि रूढींच्या जाचातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. 
बलात्कार, अॅसिड हल्ले यांसारखे रानटी गुन्हे सुरू आहेत. हे सुदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे? एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्यातून अनेक तरुण मुलींवर हल्ले होतात, त्यांचा चेहरा विद्रूप केला जातो. हे रानटीपणाचे लक्षण नव्हे का? त्यामुळे प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आपले परीक्षण खूप केले, समाजाने स्त्रियांचे परीक्षण तर पावलोपावली केले. आता वेळ आली अाहे ती समाजाने स्त्रियांबद्दल स्वत:चेच परीक्षण करण्याची.  

लेखिकेचा संपर्क : ७८८७३६८९४९

बातम्या आणखी आहेत...