आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 चा असाही धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईवर १० वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याला दहा वर्षं झालीत. हल्ल्याचं स्वरूप, दहशतवादी ज्या मार्गाने आले ते, मरण पावलेल्यांची संख्या, हे सगळंच अचंबित करणारं होतं. तसंच हा हल्ला दीर्घकाळ सुरू होता, त्यामुळे तो विस्मरणात गेलेला नाही. मुंबईकरांना तर तो आयुष्यभर लक्षात राहील, पण ज्यांचे नातलग, आप्त, मित्रपरिवार, परिचित मुंबईत आहेत अशा बाहेरच्या व्यक्तींनाही तो विसरणं कठीणच. या काळात काम करताना आलेले अनुभव पत्रकारितेच्या कारकिर्दीतले सर्वात विलक्षण असे. भय, काळजी, धैर्य, सावधगिरी, हतबलता, आदि कित्येक भावना २७ आणि २८ नोव्हेंबर २००८ या दोन दिवसांत अनुभवल्या. जगभरातले पत्रकार या काळात आणि नंतरही अनेक दिवस मुंबईत मुक्काम ठोकून होते. या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटून त्यांनी लेख/बातम्या लिहिल्या, तसंच जिवंत राहिलेल्या, हल्ल्याचे नकळत साक्षीदार ठरलेल्या व्यक्तींनाही हे पत्रकार भेटले. २७ तारखेला तर पूर्ण दिवस आणि २८ तारखेला काही काळ दहशतवादी आसपास वावरत असताना हे पत्रकार काम करत होते. त्या वेळी त्यांच्या घरच्या मंडळींना काय वाटत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ताजमहाल हाॅटेल परिसरात अन्य पत्रकार/छायाचित्रकारांसोबत परिस्थितीचं निरीक्षण करत असताना, टीव्हीवर ताज परिसरातच होणाऱ्या बाॅम्बस्फोटांची आणि गोळीबाराची दृष्यं पाहून घाबरलेल्या लेकीचा फोन आल्यावर तिच्याशी मी ताज परिसरात नाही, असं खोटं बोलणारी पत्रकार आई माहीत आहे. या लेकीला आईने रोजच्यासारखं शाळेत पाठवलं होतं, आणि तीही काम करत होती, हा मोठा धडा होता त्या लेकीसाठी. तसंच दिवस भरत आलेली बायको घरी वाट पाहातेय हे माहीत असूनही काम महत्त्वाचं, हे जाणून तिथेच असणारा पत्रकारही तिथेच भेटला. या सर्व पत्रकारांसाठी २६/११ हा पत्रकारितेतला, वार्तांकनातला, बातम्या लिहिण्यातला, तपशील टिपण्यातला, तो संवेदनशीलपणे प्रस्तुत करण्यातला मोठा धडा होता. असा अनुभव कोणालाच नको असतो, दहशतवादी हल्ले वा युद्धं होऊ नयेत, असंच सगळ्यांना वाटत असतं. परंतु ते होतात, हे वास्तव आहे. आणि वास्तव जगासमोर आणण्याचं काम पत्रकार करत असतात. २६/११ व अशा जोखमीच्या प्रसंगांमध्ये जीव धोक्यात घालून बातम्या गोळा करणाऱ्या पत्रकारांना या निमित्ताने सलाम.


mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...