आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा टक्का किती?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुढच्या महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या हळूहळू जाहीर होत आहेत. कोण बरं, कोण वाईट, कोणाला मत द्यायचं, याची चर्चा सुरू होईल. यंदाच्या निवडणुकीत आजवरील बहुधा सर्वात जास्त तरुण मतदार असण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी असल्याने हा वर्ग उत्सुक आहे, उत्साहात आहे. तरुणांना राजकारणात रस नसतो, त्यांना काय कळतं राजकारण, असा एक समज असतो. परंतु सध्या विशीत असलेला तरुण वर्ग राजकारणात चांगलाच रस घेणारा आहे. तो टीव्हीवरच्या बातम्या पाहात नसेल, चर्चा ऐकत नसेल. त्यांचे माहिती मिळवण्याचे मार्ग आधुनिक आहेत. उदा. यूट्यूबवर किंवा स्टँड अप शो. यूट्यूबवर आपली घटना, भारतातली लाेकशाही, निवडणूक प्रक्रिया यांविषयी सतत अद्ययावत असणारी माहिती देणारे काही कार्यक्रम आहेत. अनेक तरुण स्टँड अप काॅमेडियन राजकीय भूमिका घेऊनच मनोरंजन करतात. मुलगे आणि मुली दोन्ही याचे प्रेक्षक आहेत. यांच्या व्हिडिओंना लाखो हिट्स आहेत. हेच लाखो तरुण मतदार २०१९च्या लोकसभेचं रंगरूप ठरवणार आहेत. 

 

पण यात एक गोम आहे. भारतात लाखो महिलांचं नाव मतदारयादीत नाहीच, असं ज्येष्ठ पत्रकार व निवडणूक विश्लेषक प्रणय राॅय यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात म्हटलं आहे. महिलांचं नाव मतदार यादीत नसण्याची अनेक कारणं आहेत, जी पुरुषप्रधान समाजाची देणगी आहे. एक आहे, लग्न झाल्यानंतर बहुतांश महिला आपलं घर/गाव सोडून दुसरीकडे जातात. लग्नाच्या आधी मतदारयादीत नाव असलंच सुदैवाने तर ते लग्नानंतर ज्या ठिकाणी राहायला गेलं तिथे जोडलं जाईलच याची शाश्वती नसते. यातला थोडा दोष व्यवस्थेला जातो, किचकट अर्ज, कार्यालयं वेळेवर सुरू नसणं, वगैरे. परंतु सुनेचं नाव मतदार यादीत असायलाच हवं असं फार कमी जणांना वाटतं. अशा कितीतरी महिला यामुळे मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. आणि जिथे मतदानाचाच हक्क बजावण्याची संधी नाही, तिथे प्रत्यक्ष राजकारण खेळण्याची, निवडणूक लढण्याची, कार्यकर्ती होण्याची गोष्ट फारच दूरची. आज राजकारणात असलेल्या कित्येक महिलांनी नवरा/सासरा/वडील/भाऊ/मुलगा यांचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने, सत्ता घरातच राहावी म्हणून, निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांची इच्छा, त्यांची क्षमता, यांचा काहीही संबंध नाही. 

 

पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आदि पदं भूषवणाऱ्या महिला आपल्याकडे आहेत. पण, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या मतदारसंघात किती महिला उमेदवार आहेत, याचाही पडताळा घ्यायला हरकत नाही; खासकरून महिला राखीव नसलेल्या, खुल्या मतदारसंघांतून. थोडासा सर्वच पक्षांच्या धोरणांचा अंदाज येईल आणि कळेल की, महिला टक्का फारच कमी आहे.

मृण्मयी रानडे - मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...