Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | msrtc mega bharti news in marathi

एसटीतील मेगाभरतीत 2400 महिलांना संधी, 24 फेब्रुवारी रोजी होणार भरतीसाठी लेखी परीक्षा

प्रतिनिधी | Update - Feb 09, 2019, 08:28 AM IST

पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहनाच्या अनुभवात ३ वर्षांवरून १ वर्षापर्यंत कपात

 • msrtc mega bharti news in marathi


  मुंबई - एसटी महामंडळातील चालक-वाहक पदांच्या भरतीमध्ये आता हलके वाहन चालवण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिलांना महामंडळामार्फत अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.


  परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. यासोबत महिला उमेदवारांना उंचीच्या अटीमध्ये सवलत देण्यात आली असून उंचीची अट किमान १६० सेंमीवरून १५३ सेंमी करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालवण्यासंबंधी अनुभवाची अट शिथिल करण्यात आली असून ३ वर्षांऐवजी १ वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करू शकतील. महामंडळामार्फत सध्या ८ हजार २२ चालक व वाहक पदाची भरती सुरू आहे.

  यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत ८ फेब्रुवारी होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.


  या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.महिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या शारिरीक उंचीची अट शिथील करुन ती आता किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी इतकी कमी करण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली.


  अनुभवाच्या अटीतही शिथिलता देण्याचा निर्णय :
  चालक तथा वाहक पदासाठी पुरुष उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमध्ये आता शिथिलता करण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही या ञपदासाठी आता अर्ज करु शकतील, अशी घोषणाही मंत्री श्री. रावते यांनी केली. अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षाचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथील करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.

Trending