आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
आंतरराष्ट्रीय सीमेलगचे प्रदेश अस्थिर तर सीमेआडचा देशही असुरक्षित... हा तर्काचा धरून असलेला विचार. पण वर्चस्वाच्या राजकारणात तसा विचार केला जात नाही. भारताच्या संदर्भातही तसा विचार झाला नाही. म्हणूनच सीमेवरची असूनही उत्तरेत काश्मीर आणि ईशान्येत मणिपूर-आसाम ही राज्ये अस्थिरतेच्या खाईत लोटली गेली. या राज्यांमध्ये लष्कराला सर्वाधिकार देण्यात आले. त्यातून सीमेपलीकडच्या दहशतवादी आणि फुटीरवादी संघटनांना बळ येत गेले. स्थानिकांमध्ये असंतोष, अविश्वास वाढीस लागला. निवडणूकरुपी लोकशाहीच्या महाउत्सवात ही अस्थिरतेचा शाप लागलेली राज्येदेखील सामील होत आहेत. त्यातल्या दहशतवादाने त्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये शाह फैजल या टॉपर राहिलेल्या आयएएस अधिकाऱ्याने पदाचा राजीनामा देत "जम्मू अँड काश्मीर पीपल्स मुव्हमेंट' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घटना नुकतीच घडली. अनेक जाणकार या घटनेकडे आशेने पाहात असताना शाह फैजल यांनी खास "दिव्य मराठी-रसिक'ला दिलेली काश्मीरच्या प्रश्नांना नेमकेपणाने भिडणारी ही मुलाखत...
प्रश्न : काश्मीरमधल्या बहुसंख्य जनतेचा राजकीय प्रक्रियेवरचा विश्वास उडालेला असताना, तुमच्या राजकीय प्रवाहात येण्याने कितीसा प्रभाव आणि फरक पडणार आहे?
शाह फैजल : सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जनता मुख्य प्रवाहातल्या राजकारणाशी फटकून वागते तेव्हा त्याचे दुष्परिणाम, त्यातून होणारे नुकसान मी खूप जवळून अनुभवले आहे. अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित असलेल्या काश्मीरी तरुणांनी गेल्या काही वर्षात निवडणुकीतही सहभाग घेतलेला नाही की, राजकीय प्रक्रियेत दाखवलेला नाही. पण म्हणून वास्तव बदलेले नाही. वास्तव काय आहे तर, काश्मीरात निवडणुका होत आल्या आहेत. आमदार-खासदार निवडून येत अाहेत, मंत्रीपदी नेमले जाताहेत आणि इथला युवक राजकीय पक्षांवर शोषणाचा केवळ आरोप करत आले आहेत. माझ्यामते, आता प्रत्यक्ष व्यवस्थेत जाऊन बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे. माझ्या स्पष्ट विचार हा आहे की, गेली तीस वर्षं काश्मीरने जे अपरिमीत नुकसान भोगले आहे, वेदना अनुभवली आहे, त्याचे मुळातच कारण काश्मीरींना मुख्य प्रवाहातल्या राजकारणाबद्दल असलेल्या अनास्थेत दडले आहे.
आज काश्मीरी युवकांचा छळ होतोय, त्यांच्याविरोधात बळाचा अनिर्बंध वापर होतोय,त्याचे कारणच काश्मीरमध्ये या युवकांची बाजू घेऊन लढणारे,त्यांना सुरक्षितता पुरवणारे नेते नाहीत, हे आहे. काश्मीरमध्ये आज ड्रग्जची समस्या आहे, काश्मीरमध्ये आज मानसिक आजारांची समस्या आहे, रोजगाराच्या संधी नाहीत. मात्र राजकीय पक्षांचे युवकांचे शोषण करणे अव्याहत सुरु आहे. युवकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणे गरजेचे आहे. हीच गरज मला राजकारणात घेऊन आली आहे.
प्रश्न : प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही फारुख अब्दुल्लांच्या "नॅशनल कॉन्फरन्स'पक्षात सामील होणार असे बोलले गेले होते. हा तुमचा विचार कसा बदलला?
उत्तर : ज्याला कुणास आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ करायचा असतो, तो शक्यतो प्रस्थापित राजकीय पक्षांची निवड करतो. मीसुद्धा एकवेळ तसाच विचार केला होता. पण, जेव्हा मी माझा राजकारण प्रवेशाचा विचार जाहीर केला, त्यानंतर जी परिस्थिती उद्भवत गेली, जसा सामान्य काश्मीरींचा मला प्रतिसाद मिळत गेला, त्यातही इथल्या युवा जनतेने मला स्वतंत्र पक्षाविषयी सुचवले, त्यातून मी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलो.
प्रश्न : जम्मू काश्मीरात अस्तित्व राखून असलेल्या पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि भाजप या प्रस्थापित पक्षांबद्दल तुमचे मत काय आहे?
उत्तर : माझ्या मते, प्रत्येक पक्ष त्याची त्याची भूमिका निभावतोय. आपापल्या परीने समाज आणि राज्यांसाठी योगदान नोंदवतोय. मात्र, गतकाळात इथल्या प्रादेशिक पक्षांकडून चुकादेखील झालेल्या आहेत. भविष्यात कदाचित आमच्याकडूनदेखील काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, एक गोष्ट मला इथे सांगायचीय की, जम्मू काश्मीर आणि लेह-लडाख या तीनही प्रदेशांच्या सुरक्षित भवितव्यासाठी, सौहार्द आणि बंधुत्व राखण्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या राजकीय पक्षाची नितांत आवश्यकता आहे. आज हे तीनही प्रदेश दुभंगलेल्या अवस्थेत आहेत.
प्रश्न : भारतातले राजकीय पक्ष प्रामुख्याने "सडक-बिजली-पानी' या तीन मुद्यांवर मते मागतात. तुमच्या "जेकेपीएम' पक्षांचे प्राधान्य नेमके कशाला राहणार आहे?
उत्तर : हे खरेय की, याच मुद्यांवर काश्मीरात प्रस्थापित पक्षांकडून बहुतांश वेळा मते मागितली गेली. पण आपल्याला वास्तव ठावूक आहे, की या प्राथमिक सोयीसुविधादेखील पक्षांना आजवर जनतेला पूर्णांशाने पुरवता आलेल्या नाहीत. प्रत्येक निवडणुकीत राजकीय नेते आणि त्यांच्या पक्षांनी एकसारखीच आश्वासने दिलीत, जनतेची दिशाभूल केली आहे. अशी खोटी आश्वासने देणे, हा आमचा जराही इरादा नाही.
प्रश्न : लष्कर आणि इतर सुरक्षा दलांबद्दल काश्मीरी जनतेत खूप असंतोष, अविश्वास आजवर अनुभवास आलेला आहे. तुमचा सुरक्षा दलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
उत्तर : काहीच दिवसांपूर्वी रिझवान असद पंडित नावाचा २८ वर्षांचा शिक्षक पोलीस कोठडीत मारला गेला. त्याचे हालहाल केले गेले, त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले अशी जनतेची भावना झाली आहे. अशा घटना जम्मू-काश्मीरच्या शांततेला पूर्णपणे बाधा आणणाऱ्या आहेत, काश्मीरला मुख्य प्रवाहापासून तोडणाऱ्या आहेत, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. "कस्टोडिअल किलिंग' ही नागरी समाजातली अक्षम्य बाब आहे.
वस्तुस्थिती ही आहे की, काश्मीरी युवकाला या छळवादापासून कायमस्वरुपी सुटका हवी आहे. सुरक्षा दलांनी ही गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की, प्रेमातून प्रेम जन्मते आणि द्वेषातून द्वेष. कायद्याच्या रक्षणासाठी अत्याचार आणि मुस्कटदाबी हे काश्मीर समस्येवरचा तोडगा म्हणून उपयोगात येतील, असे उपाय खचितच नाहीत. काश्मीरातल्या युवकांना प्रेम हवे आहे. आपलेपणा हवा आहे.
रक्तपात हे काश्मीरचे दैनंदिन वास्तव आहे. याचा संबंध काश्मीरी जनतेला न्याय नाकारण्याशी आणि केंद्राकडून विश्वासार्ह राजकीय संवाद नसल्याशी आहे. अशा परिस्थितीत जर आपण काश्मीरातले नागरिकांना वेठीस धरणारे वातावरण बदलले, जनतेला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल केले, युवकांचे म्हणणे जाणीवपूर्वक आणि गांभीर्यपूर्वक ऐकले, तर आपण असंतोष सहज मिटवू शकतो, यावर माझा विश्वास आहे.
प्रश्न : निवडणुकीसाठी तुम्ही पक्ष म्हणून काय तयारी केली आहे?
उत्तर : आम्ही काश्मीरात जागोजारी वेगवेगळ्या वयोगटातल्या नागरिकांसोबत बैठका घेत आहोत. त्यांच्याशी कोणताही आडपडदा न ठेवता जेवढे म्हणून शक्य आहे, त्या मुद्यांवर चर्चा करत आहोत. आमची येत्या निवडणुकीसाठी सर्व शक्ती एकवटून तयारी करत आहोत.
प्रश्न : प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहणारा युवक, सेवेसाठी काश्मीरसारख्या आव्हानात्मक प्रदेशात काम करण्याचे उद्दिष्ट बाळगतो, परंतु तुम्ही तर सेवेतून बाहेर पडलात?
उत्तर : ही गोष्ट मला इथे स्पष्ट केली पाहिजे की, माझा भ्रमनिरास झाला म्हणून प्रशासकीय सेवेतून बाहेर पडलेलो नाही किंवा सेवेत असताना माझा कोंडमाराही झालेला नाही. हे मी खूप जवळून बघत आलोय की,काश्मीरी नागरिक या ना त्या रुपात दररोजच काही ना काही गमावत आलाय. गेल्या तीस वर्षांच्या अस्थिरतेच्या काळात कित्येकांनी त्यांची आयुष्ये दिलीत, त्यांच्या उपजिविकेवर पाणी सोडले आहे, स्वप्न आणि संसाराचा त्याग केला आहे. हीच मला सर्वात प्रिय असलेल्या नोकरीचा त्याग करून, राजकारणात येण्यामागची माझी प्रेरणा आहे.
प्रश्न : काश्मीरमधल्या फुटीरवादी गटांच्याही साधारण तुमच्यासारख्याच तक्रारी आहेत. म्हणजेच त्यांच्यामते काश्मीरींचे आजवर व्यवस्थेने केवळ शोषणच केले आहे. त्यांच्यावर अन्याय- अत्याचार केलेला आहे. मग लोक असंही म्हणू शकतात, तुम्ही या फुटीरवाद्यांच्या गटांनाच का तुम्ही सामील झाला नाहीत?
उत्तर : मी व्यवस्थेतून आलेला माणूस आहे. माझा व्यवस्थेत राहून परिवर्तन घडवून आणण्यावर ठाम विश्वास आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, माझा निवडणुकीच्या राजकारणावर पूर्ण भरोसा आहे. आणि फुटीरवाद्यांना निवडणुकीच्या राजकारणाचेच वावडे राहिले आहे.
प्रश्न : राजकारणात शिरण्यापेक्षा तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास प्रशासकीय व्यवस्थेतच राहून जनतेसाठी काम करणं शक्य नव्हतं का?
उत्तर : हे खरे आहे की, अशांत प्रदेशांमध्ये नोकरशाहीची सत्ता असते. पण त्याही पलीकडचे वास्तव हे असते की, खरी सत्ता नोकशहांच्या नव्हे, इतरांच्याच हातात असते. ही सत्ता परिस्थितीच्या अपरिहार्यतेतून प्राप्त केली जाते. निष्ठूरपणे राबवलीदेखील जाते आणि माझ्या मते, हा एक समस्येचा दुर्लक्ष न करावा, असा भाग आहे.
एकीकडे नोकरदार म्हणून आम्हाला आमचे मत खुलेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य नसते. राजकीय इच्छाशक्ती नसेल तर आम्ही आमच्या कितीही चांगल्या कल्पना राबवू शकत नाही. मात्र, राजकारण येण्याने तुम्ही बदल घडवून आणू शकता. काश्मीरमध्ये आज नागरिक बळी जाताहेत, युवक व्यवस्थेच्याविरोधात बंदुका हाती घेताहेत, उघडपणे बंडखोरी करताहेत. माझ्यामते, आपण काश्मीरमध्ये राजकीय समस्येशीच झुंजतोय. त्यात काहीही द्विधा असण्याचे कारण नाही. परंतु ही समस्या लष्करी आहे असे समजून तिला भिडणे सुरु आहे. राजकीय समस्या आहे, मानून राजकारणी जेव्हा पुढे येताहेत, तेव्हा त्यांना हे सांगितले जातेय की, ही तुमची समस्या नाहीये. तुम्ही फक्त रस्ते तयार करण्यावर, इमारती आणि विजेचे खांब उभारण्यावर लक्ष केंद्रीत करा. इथे सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, लष्कर राजकीय समस्येशी भिडतेय आणि राजकारणी केवळ नागरी समस्यांना भिडण्यापुरते उरलेत.
प्रश्न : प्रशासकीय सेवेतून राजीनाम्याच्या निर्णयाबाबत तुम्ही अजूनही समाधानी आहात?
उत्तर : प्रदीर्घ विचारांतीच मी प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन राजकारण उतरण्याचा निर्णय घेतला होता. हा सूत्रबद्ध विचार होता.अपेक्षित प्रभाव नजरेपुढे ठेवून घेतलेल्या निर्णयासाठी आयुष्यात तुम्हाला योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. तशी प्रतीक्षा मी केली. कारण, आततायीपणाचा निर्णय मला नको होता. सर्व बाजूंच्या विचाराला माझे प्राधान्य होते. या निर्णयामुळे जितका मी काल समाधानी होतो, तितकाच मी आजही आहे. मला वाटत नाही, की आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यावर मला या निर्णयाबद्दल खेद वाटेल. शेवटी, माझे ध्येय आणि उद्दिष्ट नागरिकांचे कल्याण, त्यांची प्रगती आणि उन्नती हेच आहे.
प्रश्न : तुम्ही तुमच्या आठ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीचे कशाप्रकारे मूल्यमापन कराल, भवितव्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : मी एवढेच म्हणेन की, माझा प्रशासकीय सेवेदरम्यानचा काळ अविस्मरणीय होता, आणि येत्या काळातही मला जनतेची वेगळ्या मार्गाने सेवा करायला आवडेल.
प्रश्न : तुमचे राजकीय मार्गदर्शक कोण आहेत?
उत्तर : मला कुणीही राजकीय गुरु वा मार्गदर्शक नाहीत. ज्याला इंग्रजीत "मशरूम वाइल्ड ग्रोथ' म्हणतात, तसा मी परिस्थितीनुसार घडत, वाढत गेलेला व्यक्ती आहे. त्या अर्थाने परिस्थिती हीच माझी मार्गदर्शक राहिली आहे.
प्रश्न : तुमच्या मते, काश्मीर समस्येवरचा उपाय काय आहे?
उत्तर : याबाबतीत माझे मत ठाम आहे, काश्मीर ही राजकीय समस्या आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या आशा-आकांक्षा जमेस धरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान ती सोडवली जाणे आवश्यक आहे.
प्रश्न : काश्मीरमधला युवा नागरिक आणि महाराष्ट्रातला युवा नागरिक या दोघांची भिन्न विचारधारा आहे. तुम्ही या मुलाखतीच्या निमित्ताने महाराष्ट्रीय युवा वर्गाला कोणता संदेश द्याल?
उत्तर : मला वाटते, युवा देशातल्या कोणत्याही भागातला असू द्या, त्याला शांततापूर्ण जगणे, रोजगार आणि आदर सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा असते. त्यांना आपल्या कुटुंबियांसाठी आयुष्य द्यायचे असते, आपल्या आई-वडिलांना आधार पुरवायचा असतो आणि त्याचबरोबर आपली सामाजिक जबाबदारीही पूर्ण करायची असते. त्यांना भ्रष्टाचारमुक्त वातावरण हवे असते. अधिकाऱ्यांनी जबाबदार आणि उत्तरदायी संस्था म्हणून वर्तणूक ठेवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा वेळी युवकांना हव्या तशा संधी आपण उपलब्ध करून द्यायला हव्यात. महाराष्ट्रातल्या युवकांबद्दल बोलायचे झाल्यास, ते कौशल्यप्राप्त, बुद्धिमान आणि विशिष्ट गुणवत्ता असलेले युवा आहेत. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे. नेहमी समाज हा विचारांच्या केंद्रस्थानी ठेवा, या समाजासाठी विचार करा, समाजासाठी कृती करा. त्यातून स्वत:च्या आणि वडिलधाऱ्यांच्या स्वप्नांची पूर्ती करा. तुमच्या मेहनतीतून आणि त्यातून आकारास आलेल्या कार्यातून इतरांना तुमच्या मार्गावर चालण्याची स्फूर्ती द्या.
(लेखक श्रीनगरहून प्रकाशित होणाऱ्या "ग्रेटर काश्मीर' दैनिकाचे प्रतिनिधी आहेत.)
मुदस्सीर याकुब
mudasirgk@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.