आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या दिवशी सीएए, एनपीआरवरून विधानसभेत गोंधळ; फडणवीस म्हणाले - नियमबाह्य भाषण असेल तर चौकशी करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थसंकल्प अनुदानावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागावर बोलताना एनपीआर आणि सीएएवर वक्तव्य केले. मात्र, सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेते नियमबाह्य भाषण करत असून ते कामकाजातून काढून टाकावे, अशी विनंती अध्यक्ष नाना पटोले यांना केली. त्यावर माझे भाषण नियमबाह्य असेल तर तीन सचिवांची समिती नेमून चौकशी करून नियमबाह्य असल्यास कामकाजातून काढून टाका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावर दोन्हीकडून गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी कामकाज स्थगित केले.अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी केली. गृह विभागावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एनपीआर आणि एनआरसीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सत्ताधारी पक्षाने यावर आक्षेप घेत अर्थसंकल्पावर बोलणे आवश्यक असताना विरोधी पक्षनेते भलतेच मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोप करत त्यांना यावर बोलायला देऊ नये, अशी विनंती अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. तेव्हा आपण नियमाप्रमाणे बोलत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.  सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेची नियमावली वाचून दाखवत फडणवीस नियमाप्रमाणे बोलत असल्याचे सांगितले. यावर नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या नियमाप्रमाणे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने विरोधी पक्षनेत्यांना यावर बोलता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित केला.सीएएमुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही


अध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर ते म्हणाले, मंत्र्यांनी नियमावलीचा पूर्ण अभ्यास करावा. केवळ याचिका दाखल झाली म्हणून ते प्रकरण न्यायप्रविष्ट ठरत नाही. न्यायालय जेव्हा ती याचिका सुनावणीस घेते तेव्हा त्यावर बोलता येत नाही असे स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले,  उमर खालिद महाराष्ट्रात आला. त्याने भाषणात सांगितले की, ट्रम्प भारतात येतील तेव्हा रस्त्यावर उतरा आणि दाखवून द्या. त्यानंतर दिल्लीत त्याच दिवशी दंगल होते. उमर खलिदवर सरकारने काय कारवाई केली? सीएएमुळे कुणाचीही नागरिकता जाणार नाही. जे जे लोक अफवा पसरवत आहेत त्यांना दंडित करण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे. व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना चाप लावला पाहिजे, असेही ते म्हणाले. चीनमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची फुले भारतात येत आहेत. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा प्रकारची फुले भारतात आणणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...