आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुधोळांकडून टॉर्चच्या प्रकाशात द्राक्षबाग पाहणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेर : परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तालुक्यातील जागजी गावाला मंगळवारी (दि.५) सायंकाळी भेट दिली. या वेळी अंधार झाल्याने त्यांनी मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशात द्राक्ष बागेची पाहणी करून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.


जिल्हाधिकारी मुुधोळ-मुंडे यांनी द्राक्ष बागेसह खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची व्यथा जाणून घेतली. प्रशासन कायम तुमच्यासाठी असेल, असा विश्वासही दिला. अंधारातही बॅटरीच्या प्रकाशात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.


पंचनामे करण्याच्या सूचना : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना नुकसानीची माहिती मिळताच त्या तातडीने जागजी गावात पाेहाेल्या. त्यांनी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर संबंधित विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले. शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील,असेही सांगितले. या वेळी तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, कृषी सहाय्यक सचिन मगर, मंडळ अधिकारी बी. एस. कुलकर्णी, तलाठी आर.एम. कासराळे, के. बी. गायकवाड, शेतकरी आप्पासाहेब पाटील, मधुकर सावंत, हेमंत देवळकर, दीपक सावंत, नितीन सावंत, बिरू भालेकर, दगडू सावंत, विजय हाऊळ, कल्याण सावंत आदी उपस्थित होते.


उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, कृषी सहाय्यक सचिन मगर, मंडळ अधिकारी बी. एस. कुलकर्णी, तलाठी आर.एम. कासराळे आदींची उपस्थिती होती.

जागजीमध्येच पाहणी का?
जागजी हा परिसर द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध असून, गावातील शेतकऱ्यांकडे १९६ एकरवर द्राक्ष बाग आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून मदतीची मागणी होत होती.पावसामुळे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.
 

बातम्या आणखी आहेत...