आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 व्या वर्षी उमेद कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळहून माझ्या मुलांची बदली नागपूर ब्रँचला झाली. आम्ही नवीन गावात गेल्यावर आपला वेळ कसा जाईल, भजनाचा क्लास सुरू राहील का? अशा शंका निर्माण झाल्या होत्या. अमळनेरला शाळेत असताना देशपांडे सर पेटी शिकवत असत. गायन हा ऐच्छिक विषय घेऊन मी परीक्षा पास झाले. मला भजनाची व गाण्याची गोडी लागलेली होती. नागपूरला गेल्यावर माझ्या एका मैत्रिणीला कळले. तिचे घर आमच्या घरापासून जवळच होते. ती मला भेटायला आली. एकमेकींना भेटून दोघींनाही मनस्वी आनंद झाला. तिच्याकडे गुरुवारी सत्संगाला जात होते. ओळखी वाढल्या. भजनाचा क्लास लावला. आमचे भजनी मंडळ ठिकठिकाणी जायचे. पेटी- तबला साथीला असल्याने मन चांगलंच रमलं होतं.

नवनवीन भजनं शिकायला मिळत होती. एकदा संध्याकाळी भजनावरून परतत असताना आणि रानावनांतून परतणार्‍या गुरांची वेळ एकच झाली. अचानक गुरं सैरावरा धावू लागली. माझ्या मागून धावत येणार्‍या गाईने मला धक्का दिला. त्या धक्क्याने मी एका मोठ्या खड्ड्यात पडले. आजूबाजूला झोपडपट्टीची वसाहत होती. तिथल्या बायांनी मला पाहिले, अन् बाई पडली हो माय.. बाई पडली हो माय... असा एकच गलका करत त्या मदतीला धावल्या. माझ्या मैत्रिणीही तेथे पोहोचल्या. खड्डा पार खोल नव्हता, फारशी दुखापत झालेली नव्हती.

पाय मुरगाळला होता. एका मैत्रिणीचे पती डॉक्टर होते. त्यांनी मला इंजेक्शन दिले. पायाला प्लॅस्टर केले. 15 ते 20 दिवस घरीच होते. नवीन गाणी आपल्याला पेटीवर यायला हवी, ही खंत मनाला होती. मुलांचे लग्न वगैरे काही झालेले नव्हते. त्यामुळे मी घरची सगळी कामे आवरून पेटीच्या क्लासला जायला लागले. मध्ये 25-30 वर्षांचा खंड पडला होता. तरी 75 /76 व्या वर्षीही गाण्याची उमेद कायम होती. आता 84 वर्षे वय झाले, म्हातारपणात माझा छंद पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.