आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरजचा पुनर्जन्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्या वेळी मी बीडला बलभीम कॉलेजमध्ये नोकरीला होतो. आमचा मुलगा नीरज 10 महिन्यांचा होता. वाड्यातील मुले त्याला खेळवत असत. आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो. शेजारी जेकब मॅथ्यूज म्हणून केरळकडील ख्रिश्चन कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगी होती. त्या मुलीच्या आईला आम्ही अंबिलीची आई म्हणायचो. एक दिवस घरमालकाची बारा-तेरा वर्षांची मुलगी नीरजला खेळवायला आली. सुनीता स्वयंपाकघरात काम करीत होती. त्या मुलीने नीरजला कडेवर घेतले आणि ती गॅलरीत उभी राहून खेळवू लागली. ती गॅलरी वाड्याच्या आतल्या भागाकडे होती. त्या मुलीने नीरजला खेळवता खेळवता गॅलरीमध्ये असलेल्या लोखंडी पाण्याच्या ड्रमवर ठेवले. ड्रमचे झाकण मागे सरकले आणि नीरज ड्रममध्ये पडला. मुलीची उंची ड्रमपेक्षा थोडी कमी होती. माझे व सुनीताचे जी मुले नीरजला खेळवायची त्यांच्याकडे लक्ष असायचे. ड्रमवरच्या झाकणाचा आवाज ऐकू आला. त्या मुलीने ‘काकू काकू’ असं ओरडणं सुरू केलं होतं. नीरजचाही रडण्याचा आवाज वेगळाच येत होता. ड्रममध्ये गटांगळ्या खाणाºया नीरजला अंबिलीच्या आईने बाहेर काढले. तिने त्याला डोके खाली करून गरगर फिरवले. नीरज जिवाच्या आकांताने रडत होता. आम्ही दोघंही सुन्न झालो होतो. घाबरलो होतो. ड्रमचं झाकण अलीकडे सरकलं असतं तर... या कल्पनेनेच अंगावर काटा आला. जर अंबिलीची आई तिथं नसती तर? काही विपरीत घडले असते तर? अंबिलीच्या आईनं एका परीनं नीरजला पुनर्जन्मच दिला, असं म्हणावं लागेल.