आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणी कॉपी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट आहे 1985 ची. पारनेर तालुक्यात त्या वेळी इयत्ता 12 वी परीक्षेसाठी एकच केंद्र असे. एका परीक्षा दालनात एका परीक्षार्थीची संशयास्पद हालचाल मला जाणवली. त्याचा चेहराच सांगत होता. माणसाचा चेहरा फार बोलका असतो. त्याच्याजवळ गेलो असता (Wonders of Science) या निबंधाची कॉपी तो करत असल्याचे आढळले. त्याला परीक्षा दालनाबाहेर आणून केंद्र संचालकांच्या कक्षाकडे घेऊन येत होतो. त्याची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, कॉपी माझ्या हातात होती. शिक्षण मंडळाच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी त्याला मी घेऊन येत होतो.

क्षणार्धात मला काही कळायच्या आत माझ्या हातातून पेपर व इतर कागदपत्रे हिसकावून पहिल्या मजल्यावरून धाडकन उडी मारून तो टाकळी ढोकेघरच्या दिशेने धावत सुटला. आमच्या सर्वांच्या काळजात धस्स झाले. तोंडाचे पाणी पळाले. घसा कोरडा पडला. त्याला पकडण्यासाठी पोलिस व इतर कर्मचारी धावले. त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा आम्हाला उत्तरपत्रिकेची काळजी लागली होती. माझी तर पाचावर धारण बसली. त्याचा पेपर असल्याशाय गठ्ठे सीलबंद करणे शक्य नव्हते. शिवाय त्याचा हातपाय मोडला असला तर..! बर्‍यापैकी दमछाक झाल्यावर त्याच्या लक्षात आले, पोलिस अजूनही पाठलाग करत आहेत. आमच्या सुदैवाने त्याला सुबुद्धी सुचली असावी. हातातील पेपर व इतर कागदपत्रे टाकून तो पळत राहिला. पेपर मिळाल्यावर माझा जीव भांड्यात पडला. पर्यवेक्षणासाठी येणार्‍या शिक्षकांनी त्याला लगेच ओळखले होते. रात्री त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली. त्याला दिलासा दिला. उद्या परत पेपरला येण्यास सांगितले. कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिले. परीक्षा सुरळीत पार पडल्या. विद्यार्थी मित्रांना विनंती अशी की जीवघेणी कॉपी बरी नव्हे!