आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्माची आवड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च 2002 मध्ये गावाकडील वडीलधा-या मंडळींनी ज्ञानेश्वरी सप्ताहाची जबाबदारी आम्हा तरुणांवर सोपवली होती. काही तरुण वारक-यांनी पुढाकार घेतला होता. मी तर माळकरीही नव्हतो. माझे मित्र भजन-कीर्तन करत असत. हे उतारवयातील कार्य, असा माझा समज होता. एकदा ज्ञानेश्वरी सप्ताहास लुनावरून आम्ही तिघे मित्र एका गावी चाललो होतो. ज्यांच्याकडे लुना होती त्यांनी आम्हाला ट्रिपलसीट नेण्याचे ठरवले होते. सावकाशपणे आम्ही लुनावरून चाललो होतो. उमरग्यापासून 20 कि.मी. अंतर आल्यानंतर एका वळणावर टिप्परचालकाने उडवले. काही कळायच्या आत आम्ही तिघे एका खड्ड्यात पडलो. शेतातील काही लोकांनी आम्हाला प्रथम उमरग्याच्या दवाखान्यात, नंतर सोलापूरला उपचारासाठी हलवले. महिनाभर दवाखान्यात होतो. तिघांच्याही पायात रॉड टाकण्यात आला होता. दवाखान्यात भेटायला येणारा प्रत्येक जण देवाच्या कृपेने वाचलात असे म्हणत होता, पण सहा महिने पायी चालता येत नव्हते. अध्यात्माचा तेव्हा भजनासाठी मंदिरात जाण्यापुरताच संबंध येत होता. 2008 मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागल्यानंतर एका सहकारी प्राध्यापकाची ओळख झाली. ते वारकरी होते. भजन करत असत. ते वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेली माझी भाषणे ऐकत. शिवजयंती, गणपती उत्सव, शाळा-कॉलेजातील व्याख्यान लक्षपूर्वक ऐकत. त्यावर चर्चाही करत. मला प्रवचन करण्याचा सल्ला त्यांनीच दिला. त्यासाठी प्रथम माळकरी व्हावे लागते, गुरू करावा लागतो असे सांगितले. त्यांनी माझ्यासाठी एक माळ पंढरपूरहून आणली. एका गुरूकडून घालण्यास सांगितले. त्यांच्या स्वत:च्या गावी (2009 ) माझे पहिलेवहिले प्रवचन झाले. कधीकाळी घरासमोरील मंदिरात हरिपाठ म्हणणारा आज अपघातामुळेच अध्यात्मात आलो आहे.