आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीने गहिवरले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अँजिओग्राफी’ अथवा ‘प्लास्टी’ हे शब्द कोणा इतरांच्या बाबतीत कानी पडले तर त्याचे गांभीर्य विशिष्ट मर्यादेपर्यंत सीमित राहते, परंतु तशी वेळ स्वत:वर आल्यानंतर काळजाचा ठोकाच चुकतो की काय असे वाटू लागते. असा अनुभव नुकताच मला आला. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाने पित्ताचा त्रास झाला असावा, असे समजून घरगुती उपाय केले. अस्वस्थता बळावत गेल्याने डॉक्टरी सल्ला घेतला. ईसीजीमधील बदलामुळे काळजीचे सावट वाढले होते. शंकानिरसनाकरिता अँजिओग्राफी करून घेतलेली बरी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. एमजीएममधील डॉक्टरांच्या समुपदेशनामुळे मनाची तयारी होण्यास वेळ लागला नाही. सुसज्ज अशा आॅपरेशन थिएटरमध्ये आल्यावर नीरव शांततेच्या वातावरणाशी समरस झाले. कार्डिओलॉजिस्टांच्या आगमनापूर्वी प्राथमिक तयारी झाली होती. ते येताच अँजिओग्राफी केव्हा पार पडली ते कळलेसुद्धा नाही. मुख्य डॉक्टरांना मदत करणाºया इतर लोकांचे कौतुक वाटले. सुदैवाने सर्व टेस्ट नॉर्मल निघाल्या असल्याचा निष्कर्ष आला. बाळासाहेब ओंबळे नावाचे एक गृहस्थ तेथे होते. मी घाबरलेली पाहून त्यांनी मला खूप धीर दिला होता. नंतर ज्या हाताच्या मार्गाने प्रक्रिया झाली होती तो हात जड पडला अथवा काही त्रास झाल्यास सांगा, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. त्यांच्या बोलण्यानेच मला खूप बळ आले. इतकेच नव्हे, तर वॉर्डात येऊन त्यांनी माझी विचारपूस केली. हाताची हालचाल करवून घेतली. त्यांची माणुसकी पाहून भारावून गेले. अवाढव्य यंत्रसामग्रीने आणि औषधींनी त्यांचे काम केले. कर्मचा-यांच्या माणुसकीमुळे माझे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले. नाहीतर आजकाल दवाखान्यातील धीरगंभीर वातावरण, डॉक्टरांचे व्यावसायिक वर्तन, नर्स आणि इतर कर्मचाºयांचे खेकसणे असा प्रकार पाहून रूग्ण आणि त्याचे नातेवाईक विचित्र कोंडीत सापडतात. घाटी रूग्णालयात तर रूग्णांसोबत कर्मचा-यांचे वारंवार खटके उडताना दिसतात. मला मात्र याच्या अगदी वेगळा आणि सुखद अनुभव आला. म्हणूनच तो शब्दबद्ध करावा वाटला.