आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातीमुळे तत्त्वाचा बोध!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात आम्ही सर्व जण कौटुंबिक कारणाने एकत्र आलो होतो . सर्वांच्या गप्पागोष्टी चालू असताना मध्यभागी बसलेल्या तीन वर्षांच्या नातीने अचानक घाईघाईने मांडीवरील बाहुली जमिनीवर ठेवली. मी तिला सहज विचारले, ‘आर्या, काय झाले?’ ती म्हणाली, ‘आजोबा, माझ्या बाहुलीने किनई ‘शी’ केली आहे.’ तिचे मार्मिक उत्तर ऐकून सर्व जण मोठ्याने हसले.

माझ्या मनात विचार आला, आम्ही मोठी माणसेही शेजारती करून देवाला झोपवतो; काकड आरती करून परत सकाळी देवाला उठवतो. हे आमचे कृत्यदेखील हास्यास्पदच नव्हे काय? देव खरोखर ‘झोपला’ तर हे चराचर विश्व अस्तित्वात राहील काय ? मनात प्रश्नांचे काहूर उठले. खरा देव कसा आणि कोठे असतो ह्याचा विचार करता करता एकदम संत कबीरांचा एक दोहा आठवला,

‘कस्तूरी कुंडली बसै, मृग ढू नढे बनमाही । ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखे नाही ।।’
कबीराने म्हटले आहे, ‘कस्तुरी’ नावाचे सुगंधी द्रव्य हरणाच्या बेंबीतच असते; परंतु सुगंध कोठून येत आहे, हे शोधण्यासाठी तो जंगलभर सैरावैरा पळत असतो ! तसेच प्रत्येकाच्या शरीरातच ‘राम’ आहे; त्याचा जगभर शोध घेण्यापेक्षा स्वत:च्या ‘अंत:करणात’ त्याला बघा. छोट्याशा प्रसंगाने मला महान तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार झाला. लहान मुलांच्या कृतीवरून कधी- कधी मोठ्या गोष्टीचा बोध होतो. ती कृती करताना अबोध असतात. पण बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातून गहन अर्थ लक्षात येतो. तेव्हा आपणास कळते की, अरेच्चा! एवढी साधी गोष्ट पण आपणाला कशी कळाली नाही. ती लहान मुलांनी तर चुटकीसरशी सोडवून दाखवली.