आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांदळाच्या मापात गंडवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी सातवीत होते. त्या वेळी दारावर वस्तू विकणा-यांचे प्रमाण तुरळक होते. ‘सेल्समन’ हा शब्दप्रयोगही तेव्हा प्रचलित नव्हता. दुपारची जेवणाची वेळ होती. आई शिवणकाम करत होती. आम्ही भावंडे अभ्यासात मग्न होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तांदूळ घ्यायचे का, असा आवाज ऐकल्याने मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आई ‘नाही’ म्हणाल्याचे दिसले. कारण दारावरचे काही घ्यायचे नाही, अशी वडिलांची सक्त ताकीद होती. मात्र ‘छान सफेद तांदूळ आहे, घ्या ना,’ अशी आर्जवे चार महिलांची चालू होती. त्यांच्या डोक्यावर तांदळाची पोती होती. तेवढ्यात शेजारच्या काकू आल्या. एक-दोन अजून जमल्या. तांदूळ चांगल्या प्रतीचा वाटला. पांढरा शुभ्र पॉलिश केलेला तांदूळ सर्वांच्या पसंतीस उतरला. तरीही तांदूळ कसा आहे, कोणत्या दराने देणार? किती कमी करणार? वगैरे प्रश्नांच्या फैरी चालूच होत्या. तसेच कमी किमतीत त्या जर देण्यास तयार असतील तर घ्यायला काय हरकत आहे, असे सर्वांचे मत पडले. आईची इच्छा नसताना तिलाही शेजा-या ंनी तांदूळ घेण्यास भाग पाडले. त्या महिलांनी अडीचशे किलो तांदूळ मोजले. प्रत्येकी पन्नास किलो तांदूळ त्या पाच जणींनी मिळून घेतला होता. पैसे घेऊन त्या चौघी निघून गेल्या. नंतर वाटून घ्यावा म्हणून पुन्हा तांदूळ मोजले असता फक्त पन्नासच कि लो भरला. किती वेळाही मोजला तरी तो पन्नासच भरायचा. सगळ्या जणी घाबरल्या. आपणास त्या महिलांनी पुरते गंडवले असल्याचे स्पष्ट झाले. त्या महिलांचा शोध सुरू झाला. अखेर पन्नास किलो तांदूळ मिळाल्याच्या आनंदात असलेल्या सर्व काकूंना आणि आईला प्रत्येकी फक्त दहा किलो तांदळावर समाधान मानावे लागले. एवढासा तांदूळ पाहून सर्वांचीच मने ओशाळली.