आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वक्तृत्व स्पर्धेची हौस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळेत पाचवीत असल्यापासून मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची भारी हौस होती. वर्गात स्पर्धेची नोटीस आली की, सर्वप्रथम नाव मी नोंदवत होतो. त्या शाळेत मुलांसाठी छोटी लायब्ररी होती. तेथे थोरामोठ्यांची चरित्रे असणारी छोटी पुस्तके मिळत, त्यावरून मी भाषण तयार करत होतो. तसेच आयत्या वेळी म्हणजे केवळ चिठ्ठ्या टाकून विषय निवडायचा आणि पाच मिनिटांत भाषणाची तयारी करायची अशा स्पर्धेतही भाग घेतला. कधी तरी बक्षीस मिळायचे, कधी शाबासकी! गणेशोत्सवात तर हमखास वक्तृत्व स्पर्धेत माझा सहभाग असायचाच. मोठी मुले किंवा आमचे शिक्षक ज्या पद्धतीने बोलत त्यांच्या भाषणशैलीचे निरीक्षण करून मीही भाषण ठोकत असे. शालेय पातळीवरील वक्तृत्वाचा अनुभव मला महाविद्यालयात कामी आला. तालुक्याला मोठे महाविद्यालय होते. मुलांची हॉलमध्ये गर्दी झालेली. मी अकरावीत असेन. स्पर्धेत भाग घेतला खरा; पण प्रिन्सिपॉल, इतर सर आणि काही सरावलेले विद्यार्थी बघून माझी गाळण उडाली. योगायोगाने ‘माझे बालपण’ हा ऐन वेळी मिळालेला विषय होता. मी भाषणाला उभे राहताच, पोरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी हॉल दणाणून सोडला. मी मोठा आवंढा गिळला. प्रिन्सिपॉल सरांकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. ते मिश्कील हसत होते. शेवटी मनाचा हिय्या करून मी लहानपणी कोणकोणाच्या खोड्या कशा केल्या... यावर बोलत सुटलो. पोरांचे प्रोत्साहन पाहून मला चेव सुटला आणि बिनधास्त शब्दांची फटकेबाजी सुरू केली.

परीक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. प्रिन्सिपॉल सरांनी जवळ येऊन पाठ थोपटली. भाषण संपले आणि मुलांनी टाळ्या व शिट्ट्यांनी पुन्हा हॉल डोक्यावर घेतला. अर्थातच प्रथम क्रमांकाचे बक्षीस मलाच मिळाले. एका मोठ्या संपादकांकडून पारितोषिक घेताना माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते एक वेगळेच अनुभवविश्व होते. त्यानंतर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत भाग घेण्याइतपत माझे धाडस वाढले.