Home »Mukt Vyaspith» Mukt Vyaspith Article

बिल्डरची मानसिकता

प्रा. शिवाजी वाठोरे | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • बिल्डरची मानसिकता

नोकरीच्या निमित्ताने आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालो. औरंगाबाद शहर शैक्षणिक चळवळीचे केंद्र. आमच्या नोकरीच्या गावापासून हाकेच्या अंतरावर हे शहर आहे. सात-आठ मित्रांचा आमचा ग्रुप होता. आम्ही असे ठरवले, औरंगाबादला घरे घ्यावीत. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, भविष्याचा विचार, शिवाय इच्छाही आहे, ऐपतही होती. मग काय हरकत आहे? एखाद्या बिल्डरला आम्ही ग्रुपनेच जाऊन भेटल्यास किफायतशीर भावात घरे मिळतील, असाही विचार केला. हा विचार सर्वमान्य झाला. मग आम्ही जमेल त्या बिल्डरशी संपर्क साधू लागलो. एका साइटवरची रो-हाऊसची जागा पसंत पडली. घासाघीस करून मी घरांची किंमत ठरवली.

आमच्या सात-आठ जणांची यादी आमच्याजवळ होती. समूहाने घरांची विक्री होत असल्याने बिल्डर आणि त्यांचा एजंट खुश होता. एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घ्यावे यासाठी पुढची धडपड सुरू झाली. यादरम्यान किमान चार- पाच वेळा बिल्डरांच्या भेटी झाल्या. एका भेटीत त्याने सांगितले, सर, ते तुमच्यासोबतचे कांबळे आहेत ना? त्यांना सोडून मी सर्वांना घरे देतो. आम्ही म्हणालो, का हो! तुमचे त्यांचे काही भांडण? तो म्हणतो, नाही! त्याला कांबळे काळे की गोरे हे माहीत नाही... म्हणजे याला आडनावाचा प्रॉब्लेम होता. आम्ही कोणीच त्याच्याकडून घरे घेतली नाहीत. त्याच्या नाकावर टिच्चून अतकरे नावाच्या बिल्डरकडून घरे घेतली. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वावरतो. इतक्या वर्षांनंतरही प्रतिगामी आणि जातीयतेची पाळेमुळं शिकल्यासवरल्या लोकांची मानसिकतेत किती खोलवर रुजली आहेत, हे पाहून खरोखरच संताप येतो. सर्वच जण असे असतात असेही नाही.

प्रा. शिवाजी वाठोरे, सिल्लोड, जि. औरंगाबाद

Next Article

Recommended