आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतरीची भूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच मी पुणे प्रवासावरून आले. आरक्षित डबा होता. समोरच्या बर्थवर एक 75-80 वयाचे पती-पत्नी. त्यांच्या मोठ्या तीन बॅगा अगदी सहजपणाने उचलल्या होत्या आणि त्या बर्थखाली सरकवल्याही होत्या. ते पाहून मनात आलं, तरुण कुणी सोबतीला असले की प्रवास छान, सुखावह व बिनधास्त होतो. गाडी सुरू झाली. थोड्या वेळाच्या संवादाने कळाले की तो त्यांचा नातू आहे. शिक्षणासाठी पुण्याला असतो. मग मोठे स्टेशन आले. त्याने खाली उतरून पाय मोकळे केले व या दोघांना ‘वडे आणू का? भूक लागली असेल तर आणतो ना,’ असे म्हणाला. त्यांनीही ‘नको’ अशी खूण केली. परत डब्यात आल्यावर मोबाइलवर बोलण्यात तो गुंतलेला होता. पुणे जवळ आले. पुण्याच्या सिग्नलजवळ गाडी 15 मिनिटे थांबली तेव्हा तो खाली प्लॅटफॉर्मवर उतरलेला होता. आजोबा म्हणाले, मीही दुकानदार. माझाही मोठा धंदा आहे. अजूनही दुकान सांभाळतो; पण एवढा वेळ फोनला चिकटलेला नसतो. ही तरुण पोरं उजाडल्यापासून झोपेपर्यंत इतका वेळ कुणाशी, किती वेळ नि काय बोलतात तेच कळत नाही. आता हा आम्हाला रिक्षात बसवून होस्टेलवर जाईल. परत चार महिने भेटणार नाही. पण आमच्याशी काही चार शब्द बोलायचे व आम्हाला जरा आनंद द्यायच्या गोष्टी यांच्या लक्षातच कशा येत नाहीत?

आमच्या बॅगा आणि आम्ही सारखेच. बॅगा खाली ठेवल्या. आम्हाला वर बसवलं, वडे हवेत का विचारलं खरं, पण पोटाच्या भुकेपेक्षा त्याच्या आपुलकीच्या शब्दांची आंतरिक भूक जास्तच लागली होती. त्याबाबतीत उपासमार होते आहे. ती न भागल्याने आम्ही कासावीस होतोय हे याला कधी नि कसं समजणार? पहाटे पक्ष्यांच्या घरट्यातून अजून किलबिल ऐकू येते, पण घरातली किलबिल मात्र संपत चाललीय. यंत्रांच्या मध्यस्थीशिवाय समोरच्याशी सहज, सरळ संभाषण दूर होत आहे व त्या निखळ आनंदला आपण मुकतो आहोत, हे सत्य आहेच.