आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाठ पडली ठकाठका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग. त्या वेळी माझे पती हयात होते. माझ्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र होते. दुपारची वेळ होती. मी काही कामानिमित्त घरून पायी सेव्हन हिल्सपर्यंत आले होते. काही अंतर चालल्यानंतर काही तरुण पाठलाग करत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी तशीच पुढे चालत राहिले. तेव्हा एकाने मागून ‘आंटी - आंटी’ असा आवाज दिला. मी मागे वळून पाहिले. एक तरुण माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘आपको साहब बुला रहे हैं...’ त्याच्या साहेबांना मी दुरून पाहिले. डोळ्यावर गॉगल, डोक्यावर हॅट अगदी अपटुडेट दिसत होता. मला नवलच वाटले. त्या मुलाला आणि त्याच्या साहेबांना मी या भागात त्याआधी कधीच पाहिले नव्हते. कदाचित ते मला ओळखत असतील असे वाटले. मी साहेबांजवळ गेले. मी त्यांना नमस्कार करून त्यांचा परिचय विचारला. ते म्हणाले, ‘हम पुलिस के आदमी हैं.. आप पेपर नहीं पढती क्या? कितनी चोरियां हो रही हैं. चाकू - छुरे चल रहे हं... लूटपाट हो रही है... हम लोगों को सावधान करने के लिए खडे हैं. तुम्हारे गले में मंगलसूत्र है, निकाल कर पर्स में डालो, और आगे बढो..’ त्याने असे म्हणताच मी पदराने गळा गच्च झाकून घेतला. तेवढ्यात एक तरुण तेथून मोटारसायकलवर जात होता. त्याने त्यालाही बोलावले. त्याच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी काढून त्याला खिशात ठेवायला सांगितली. त्यानेही पटकन ती खिशात ठेवली. त्याचे उदाहरण देऊन तो मलाही मंगळसूत्र पर्समध्ये ठेवण्यास सांगत होता. परंतु त्याचा संशय आल्याने मी तसे केले नाही. ‘माझं घर इथंच जवळ आहे. घरी गेल्यावर काढते,’ असे म्हणत मी तिथून काढता पाय घेतला. झपाझप पावले टाकत मी घरी पोहोचले. माझी भीतीने गाळण उडाली होती. तेव्हापासून मी खरे मंगळसूत्र काढून ठेवण्यास व नकली मंगळसूत्र वापरावयास सुरुवात केली. आजही वर्तमानपत्रात चोरीच्या घटना वाचल्या की मला ते डायलॉग आणि माझ्यावर बेतलेला प्रसंग आठवतो.