आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्शनाच्या गर्दीत चेंगराचेंगरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल देवदर्शनास सहकु टुंब सहल काढण्याची कल्पना चांगलीच रुजली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या याचे नियोजनही करून देतात. महाराष्ट्राबाहेरील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे तिरुपती बालाजी देवस्थान. श्रीमंत देव म्हणून त्याची ख्याती. अख्ख्या भारतातून येथे लोक श्रद्धेने येतात. भाविकांची संख्या वाढतेच आहे. प्रसिद्ध देवस्थान असल्याने आम्हीही सहकुटुंब तिरुपतीला जाण्याचे ठरवले. सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आठ दिवसांच्या प्रवासाचा कार्यक्रम आखून तिकिटे आरक्षित केली होती. आम्ही प्रथमच तिरुपतीला जात असल्याने मनात थोडीशी धास्तीही होती. लांबचा प्रवास, अनोळखी प्रदेश, तेथील भाषाही समजेल की नाही, शिवाय राहण्याची सोय कशी होईल अशा विविध चिंता मनात सतावत होत्या, तरीही शंका दूर सारत आमचा प्रवास सुरू झाला. काचीगुडा ते तिरुपतीदरम्यानचा प्रवास रात्री दहाच्या सुमारास सुपरफास्ट एक्स्प्रेसने सुरू झाला. तिरुपतीला आम्ही सकाळी सहा-सातच्या वेळेस पोहोचलो. सकाळी रूम वगैरे सोपस्कार पार पडले. दर्शनाची वेळही सायंकाळी 6 वाजताची मिळाली होती. प्रवासात थक लेलो असल्याने दुपारपर्यंत रूमवर आराम केला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रांगेत उभे राहिलो.

येथूनच मनात नाराजीची भावना मूळ धरू लागली. काही लोकांचे गर्दीत घुसणे सुरू झाले. प्रवेश सुरू होण्याच्या आतच लोटालोटी होत होती. मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर अरुंद बोळ असल्याने गर्दी असह्य झाली. लोंढ्याचा दबाव वाढत गेला. माझा मुलगा लहान असल्याने त्याचा श्वास गुदमरू लागला. मी लोकांना विनंती करत होतो; पण ऐकतो कोण? शेवटी कसेबसे दर्शन उरकले. बाहेर आलो तेव्हा मुलगा तर घामेजून गेला होता. त्याने तेव्हाच मला बजावले, यापुढे इकडे दर्शनाला यायचे नाही. आलोच तर बाहेरून दर्शन घेऊया. आम्ही त्याला समजावले, असे होत असते. देवस्थानात असे बोलू नये. पण त्याची मानसिकता गर्दीमुळे बदलली होती.