आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ तळवलकरांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे वडील मोहनलाल ऊर्फ बाबूशेठ मुथा स्वातंत्र्यसैनिक होते. तुरुंगात स्थानबद्ध असताना त्यांच्यासोबत रावसाहेब पटवर्धन, बाळासाहेब भारदे, नवलमल फिरोदिया, बाळासाहेब खेर, तुळशीदास जाधव, चंदनमल गांधी अशा अनेक नामवंत व्यक्ती शिक्षा भोगत होत्या. मी पुढे शिक्षणासाठी पुण्याला गेलो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळचे प्रिन्सिपॉल एस. व्ही. कोगेकर, अत्यंत शिस्तप्रिय म्हणून परिचित होते. माझ्या प्रवेश अर्जावर पुण्यातील स्थानिक पालकांची ओळख देणे अनिवार्य होते. माझ्या वडिलांनी रावसाहेब पटवर्धनांचे नाव लिहिले होते. माझा नंबर आल्यानंतर मी कोगेकरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. स्थानिक पालक म्हणून पटवर्धन पती-पत्नींचे नाव वाचताच त्यांनी मला जवळ बोलावून विचारले, त्यांची व तुझी ओळख कशी काय? मी म्हणालो, ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. त्यावेळी रावसाहेब पटवर्धन कचरेवाडीत सीताराम बंगल्यात राहत होते. काही अडचण आली तर मला भेटत जा, असे प्राचार्यांनी सांगितले. लग्नानंतर आम्ही पती-पत्नी पटवर्धनांकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला पुण्यातील कोणते स्थळ पाहण्याची इच्छा आहे, असे विचारले.

तिने पुणे आकाशवाणी केंद्रास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कोणाला तरी फोन लावला. आम्ही शिवाजीनगरातील आकाशवाणी केंद्रावर गेलो. तेथे एक खादीधारी गृहस्थ भेटले. त्यांनी आम्हाला पटवर्धनांचे पाहुणे आहात का? अशी विचारणा केली. ते गोपीनाथ तळवलकर असल्याचे समजले आणि आम्ही चकितच झालो. वनिता मंडळाचे सूत्रसंचालन ते करत असत. शिवाय त्यांच्या विविध मालिका प्रसारित होत. आम्हा सर्वांचे परिचित असलेल्या ‘नानां’ ची अशा रीतीने भेट झाली होती. त्यांनी आम्हाला पुणे आकाशवाणी केंद्राचे कार्य कसे चालते याची माहिती करून दिली. ज्यांचे कार्यक्र म व आवाज आम्ही ऐकत होतो त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद आम्हाला झाला.