आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरांचे आशीर्वाद महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पालकांची मोलाची साथ महत्त्वाची असते. अनेकदा असे होते की, आपल्याला सर्वकाही कळते असे अनेकांना वाटत असते. कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही असा एक फाजील आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो. पण आयुष्याची वाटचाल करताना मार्गदर्शन हे महत्त्वाचे असतेच. माणसाच्या शरीरात पाठीच्या कण्याचे जसे महत्त्व आहे तसे आयुष्यात मार्गदर्शन आणि मोठ्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. पंढरपूरला डी. फार्मसी कोर्सला प्रवेश घेतला होता. पाहता पाहता कोर्स पूर्णही झाला. पण इंटर्नल परीक्षांमध्ये वारंवार अपयश येत होते, ते पाहून मनाला चिंता वाटत होती. कोणतंही काम करण्याची मानसिकताच राहिली नव्हती. सतत नापास होत असल्याने मनात नाही नाही ते विचार येत होते. अशा कठीण अवस्थेत आईवडिलांनीच मला धीर दिला. काहीही होवो, संयम सोडू नको असे वडील मला नेहमी बजावायचे. प्रथम त्यांच्या म्हणण्याचा, बोलण्याचा अर्थ कळायचा नाही; पण आता त्यांच्या म्हणण्याचे गांभीर्य समजू लागले आहे. माझी आई वृत्तीने धार्मिक होती. ती मला नेहमी पौराणिक दाखले द्यायची. देव असूनही प्रभू रामचंद्रालाही 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. तिथे माणसांचे काय, असा प्रश्न ती विचारायची. आई वडिलांच्या सततच्या मार्गदर्शनाने अपयशाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. प्रथम अपयश म्हटले की भीती वाटायची, आता अपयश म्हटले की आयुष्यातील एक संधी वाटते. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी पालकांप्रमाणे मला मित्रांनीही चांगले मार्गदर्शन केले. ज्यांना अपयश आले आहे त्यांना मला सांगावेसे वाटते की, विष पचवले म्हणून भगवान शंकराला महादेव म्हणतात . अपयश हे विषासारखे असते आणि ते पचवायलाही ताकद लागते. ही ताकद प्रत्येकातच आहे. अपयशाने खचून न जाता येणार्‍या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड द्या; हेच महत्त्वाचे आहे.