आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्याचा समजूतदारपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या घरात संक्रांतीची तयारी सुरू होती. तो दिवस 12 जानेवारीचा होता. घरातील भांडीकुंडी, कपडे, खिडक्या, दरवाजांचे पडदे, धुण्यासाठी काढले होते. त्याच वेळी माझ्या सर्वात धाकट्या मुलाला अंघोळ घालायची होती. गरम पाण्याची बादली बाथरूममध्ये भरून ठेवली होती. मुलाला अंघोळीसाठी आवाज दिला आणि मी टॉवेल आणण्यासाठी आत गेले. मुलगा धावत आला आणि आवाज आला, ‘आई गं...’ ती आर्त किंकाळी ऐकली व मी बाथरूमकडे धाव घेतली. बादलीतील उकळतं पाणी माझ्या मुलाच्या पायावर पडलं होतं. पाच वर्षाचे माझे कोवळे पोर आई... आई म्हणून कण्हत होता. त्याच्या अंगावरील पँट काढत असताना पिंडरीवरची पूर्ण सालही निघून आली होती. मी थंड पाण्याच्या नळाखाली त्याचा पाय धरला. तो सारखे विव्हळत होता. त्याही परिस्थितीत तो मला म्हणत होता. मम्मी, तू खाली माझ्या पायाकडे बघू नको. बघ मी रडतोय का? माझे पतीही धावत आले. त्यांनी लगेच बर्फाचे पाणी त्याच्या पायावर ओतण्यास सुरुवात केली. ते डॉक्टरांनाही फोन लावत होते. माझ्या मुलाचे एकच म्हणणे सुरू होते.. मम्मी, पप्पा तुम्ही माझ्या पायाकडे बघू नकात.

बघा मी रडतोय का? पाच वर्षाच्या मुलाची ही हिंमत पाहून त्याही परिस्थितीत त्याचे कौतुक वाटले. कसं सुचतं याला? काय बोलतोय हा? तो बोलतोय आणि मी धाय मोकलून रडतेय. तो मला म्हणतोय रडू नको... मी कुठे रडतोय? मिस्टरांनी फोन करून रिक्षा बोलावला. ताई आणि त्यांचे भाऊजी आले. सर्वजण त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. जखम खोलवर होती. त्यामुळे जवळपास 45 दिवस त्याला दवाखान्यात ठेवावे लागले. हा दीड महिना कसा काढला ते आम्हालाच माहीत. पण या काळात तो मला म्हणत असे रडू नकोस... बघ मी रडतोय का? माझ्या मुलाकडे इतका समजदारपणा कसा आला, हे मला अजूनही कळत नाही.