आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाची नवी ‘दृष्टी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालवयापासूनच काना-नाकावर चष्म्याचे ओझे लादले गेले ते थेट वयाची पन्नास वर्षे अविरत सांभाळले. चष्मा हा जणू जीवनाचा अविभाज्य अंगच झाला होता. पूर्वी ऑप्थेल्मिक चिकित्सेत हल्लीइतकी क्रांती झाली नव्हती. नियमित दृष्टी तपासणी, तद्पश्चात कमी-जास्त झालेला नंबराचा चष्मा वापरणे हाच एक मार्ग होता. लेन्सेसचा जमाना आला तेव्हा वय वाढले होते. रोज त्या डोळ्यांवर चढवणे, झोपताना काढून ठेवणे, शिवाय त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी आणि रोजच्या स्वच्छतेचे सोपस्कार शक्य होतील का याबाबत साशंकता होती, त्यामुळे धैर्य झाले नाही. अनेकदा विचार मनात आला; पण ते राहूनच गेले. शेवटी डोळ्यांचा मामला आहे ही भीती कायम असे. मात्र, वर्ष 200८ मधे एक प्रसंग असा घडला की, मला त्यापासून धैर्य प्राप्त झाले. माझा एक सहकारी बाबा पुणतांबेकर मोठ्या रजेवरून परतला. जाड भिंगांचा चष्मा वापरणारा माझा मित्र अगदी साधा चष्मा घालून समोर आला, तेव्हा मी त्याला क्षणभर ओळखलेच नाही. त्याचा चेहरामोहराच बदलला होता. माझे कुतूहल वाढले. त्याने इंट्रा ऑक्युलर लेन्स इम्प्लांट केली होती. त्याबद्दल खूप चांगली माहिती त्याने मला दिली. मीपण तशी शक्यता आजमावण्यासाठी पनवेल येथील डॉक्टर हळदीपूरकर ह्यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये तपासणीसाठी गेलो. तपासणीनंतर त्यांनी मलादेखील आयओएल शस्त्रक्रियेचा फायदा होईल, असा सल्ला दिला. त्यानुसार मी मनाची तयारी केली. डॉक्टरांचे समुपदेशन, त्यांनी प्रदर्शित केलेला विश्वास एवढा जबरदस्त होता की मी चक्क एकाच वेळी दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेस तयार झालो. निपुण अशा हळदीपूरकर डॉक्टरांच्या हस्ते अवघ्या एक तासात शस्त्रक्रिया पार पडली, लगेच सुटीही झाली. आज साठी जवळ येत असताना मी पंचांगदेखील चक्क विनाचष्मा वाचू शकतो. दोन लोचनांच्या ह्या जादूमुळे ‘चाळिशी’ची साथ, पन्नाशी उलटून गेल्यावर सुटण्याचा आगळा अनुभव मला मिळाला.