आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिता पाटील आणि कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाईंवर मी अहिराणी भाषेत 17 कडव्यांची कविता केली होती. त्या वेळी मी बीडला होतो. अभिनेत्री स्मिता पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे चित्रपट याविषयी मला प्रचंड कुतूहल आणि अभिमान वाटत असे. मी उत्साहाच्या भरात मुंबईतील त्यांच्या ग्रँट रोडवरील घरचा पत्ता मिळवला. बहिणाबाईंच्या कविता स्मिता पाटील यांना आवडत असल्याने पत्र लिहून मी त्यांना माझी कविता पाठवली. ही कविता त्यांना नक्कीच आवडेल, असा आत्मविश्वास मला होता. खरे तर मुंबईच्या समुद्रात एका थेंबासारखे ते पत्र होते. ते स्मिता पाटीलपर्यंत पोहोचेल की नाही, अशी शंकाही होती; परंतु एके दिवशी मला मुंबईहून एक पत्र मिळाले. मी उत्सुकतेने पाकीट फोडले. ते पत्र स्मिता पाटील यांचेच होते. सोबत त्यांचे एक रंगीत छायाचित्रही होते. त्यावर साधी मराठमोळी स्वाक्षरी होती. पत्र वाचायला लागलो तो तो अपार आनंदाने मन ओसंडून गेलं.

माझी अहिराणी कविता खूप आवडल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. मी सौभाग्यवतीला बैठकीत बोलावत काही न बोलता पत्र तिच्या हाती दिले. ते वाचल्यावर तिलाही माझ्यासारखाच अपार आनंद झाला. पुढे 1985 मध्ये मी कार्यक्रमानिमित्त मुंबईला गेलो होतो. बीड यूथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे युनिट स्थापन करून ते पाच वर्षे चांगल्या प्रकारे चालवल्याबद्दल राष्‍ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. त्या वेळी मी युनिटचे अध्यक्ष प्रा. व्ही. सी. गवळी यांच्यासह मुंबईला गेलो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी स्मिता पाटील यांच्या घरी पोहोचलो; परंतु त्या शूटिंगसाठी मद्रासला गेल्या होत्या. मी ते पत्र त्यांच्या आईंना दाखवले. त्यांनी ठेवून घेत स्मिताला सांगते, असे म्हटले. स्मिता यांच्या काकू आमच्या बोरसे परिवारातील होत्या. त्यांच्यासंदर्भात गप्पा झाल्या. आम्ही परतलो. पुढे काही महिन्यांनी स्मिता पाटील काळाच्या पडद्याआड गेल्या. स्मिता यांना कधीतरी भेटण्याची माझी इच्छा अपूर्णच राहिली.