आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यातील पहिले धूम्रपान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणत: ही घटना 1952 - 53 ची असावी. त्या वेळी माझा वडीलबंधू सोमेश्वर जनार्दनपंत गोरवाडकर हा माझ्या मावशी अंबुताई पुजारी यांच्याकडे बीड येथे शिक्षण घेत होता. उन्हाळ्याच्या सुटीत तो बनशेंद्रे (ता. कन्नड) येथे येत असे. माझ्या भावास लहानपणापासूनच विडी ओढण्याची सवय जडली होती. तो चोरून विडी ओढत असे. आई व मावशीच्या ते लक्षात आले होते. भाऊ असाच एकदा उन्हाळ्याच्या सुटीत बनशेंद्रे येथे आला होता. त्या वेळी तो नववीत तर मी चौथीत होतो. एकदा असेच घरातील मागील दाराने बाळू ऊर्फ सोमेश्वर घाईघाईने निघून गेला. हे आमच्या आईने पाहिले. ती मला म्हणाली, ‘तो बघ मेला बाळू, बहुतेक विडी ओढण्यास जात आहे. तू गुपचूप त्याच्या मागे जा.

पाहून ये आणि मला सांग. मी त्याच्याकडे बघते.’ मी हळूच त्याच्या मागे गेलो. दोनच मिनिटांत पाठलाग करून मी त्याला विडी ओढताना रंगेहाथ पकडले. मी जाऊन आईला सांगणार असे लक्षात येताच तो कळवळून म्हणाला, ‘हे बघ मी विडी प्यायल्याचे कृपा करून आईला सांगू नकोस. मी तुला एक सवती (स्वतंत्र) विडी देतो. तू गप्प बस.’ झाले. मी त्याच्या आमिषाला बळी पडलो व म्हणालो. दे मला सवती विडी. त्याने मला स्पेशल विडी देताच मी त्याच्यादेखत विडी शिलगावली. विडीचा पहिलाच झुरका मी मोठ्या टेचात घेतला. कारण मोठ्या भावाने दिलेली विडी त्याच्याच समोर ओढणे ही मला भूषणावह व कौतुकाची गोष्ट वाटत होती आयुष्यात पहिल्यांदाच धूम्रपान करत असल्याने मला जोरदार ठसका लागला. मी तसाच घरी गेलो. माझा ठसका थांबत नसल्याचे पाहून आई काय समजायचे ते समजली. आईने माझ्या पाठीत एक जोराचा रट्टा घातला. भाऊ मात्र बाहेर पळून गेला. हे पहिले धूम्रपान पुढे मला आयुष्यभर लक्षात राहिले. असे असले तरी माझा भाऊ उत्तम हार्मोनियमवादक होता. त्याचा आवाजही गोड होता. अक्षर खूप सुंदर होते. तो पुढे शिक्षक झाला. उत्तम कलाकार असल्याने गावात त्याला खूप मानही होता. 2003 मध्ये तो वारला. मीदेखील आज सत्तरीच्या पुढे आहे. भाऊ आणि आईची आठवण झाली की मन भरून येते.