आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा आले नसते तर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे मोठे बंधू हरिभाऊ मुंबईतच स्थायिक झाले होते. मुंबईचे दादा अधूनमधून गावाकडे सर्व मंडळीना भेटण्यासाठी येत असत. त्यांच्या बोलण्यातून मुंबईनगरीची सुरस माहिती ऐकण्यास मिळत असे. गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, लोकलचा प्रवास, हँगिंग गार्डन, विमानतळ, बूट हाऊस, इत्यादीबाबत त्यांच्याकडून ऐकून होतो. मला हे कधी पाहायला मिळेल, याची खूप उत्सुकता लागलेली असायची. दादांच्या मी खूप मागे लागलो पण ते काही मला दाद देत नव्हते. एका सुटीत मी माझा प्लॅन बदलला. गावाकडे जाण्याऐवजी मुंबईला जाण्याचे ठरवले. कोणालाही कळू द्यायचे नव्हते. दादांना मात्र अंतर्देशीय पत्राने तसे कळवले. त्या वेळी फोनची सोय नव्हती. नाहीतर माझा प्लॅन यशस्वी झाला नसता. मनमाड-मुुबई पॅसेंजर त्या वेळी नगरहून सायंकाळी 5 वाजता निघत होती. दादा नेहमी त्याच गाडीने जात-येत असत. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी घर सोडत होतो.

रेल्वे किंवा लोकल पाहिलेली नव्हती. मी पै-पै करून 25 रुपये साठवलेले होते. गावी जातो असे सांगून नगर रेल्वेस्टेशन गाठले. नगर-ठाणेदरम्यान तिसर्‍या दर्जाचे तिकीट आठ रुपये इतके होते. मला दिलेले तिकीट अर्धे होते की पूर्ण होते ते आता आठवत नाही. परंतु दादा ठाण्यात मला घेण्यासाठी येतील असे मात्र वाटत होते. आनंदात त्या रात्री झोपही आली नाही. दुसर्‍या दिवशी पहाटे 5 च्या सुमारास रेल्वे ठाण्यास पोहोचली. माझी नजर दादांना शोधत होती. पण ते दिसेनात तेव्हा भीती वाटायला लागली. तितक्यात एक भला माणूस माझ्याजवळ आला. त्याला पत्ता दाखवल्यावर मला योग्य मार्ग दाखवला. भांडुपला आल्यावर दादा एका तिकीट खिडकीच्या रांगेत उभे असल्याचे दिसले. ‘दादा’ म्हणून मोठ्याने त्यांना आवाज दिला. त्यांनी मला एकट्याला पाहून तोंडाचा पट्टा चालू केला. घरी जाईपर्यंत तो चालू होता. त्यांनी खरडपट्टी काढली. पण मला मुंबईला पोहोचल्याचा आनंद झाला होता.