आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाची माणुसकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्या दिवशी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे घरातील सर्वजण घाबरले. असे अचानक झाल्यामुळे कुणाला काही सुचेना. रात्रीची वेळ, शेजारचे लोक बाहेरगावी गेलेले. मग मदतीला कुणाला बोलवायचे आणि कसे, याच विचारात असताना पत्नी व मुलाने समोर रस्त्यावर जाऊन पाहिले तर सर्वत्र सामसूम वातावरण, तसेही या भागात रिक्षा फारच कमी येतात. आलाच तर भाव अव्वाच्या सव्वा सांगतात. पण कसेही असो रिक्षा तर दिसावी ? परंतु नाहीच. मग काय, अशा वेळी परिस्थिती आणखीच बिकट होते. एव्हाना घरासमोर गर्दी झाली होती. आजूबाजूला ज्यांना कळले त्यांनी घराभोवती गराडा घातला होता. लगेच त्यांना दूरवर रिक्षा दिसली. गांभीर्य पाहून तो झपाट्याने जवळ आला. काहीही चौकशी न करता त्याने मला, पत्नी व मुलाला रिक्षात बसवले. सर्वांना घेऊन तो त्वरेने सरकारी दवाखान्यात पोहोचला. मला भरती करेपर्यंत रिक्षावाला तेथेच उभा होता. दुसर्‍या ग्राहकाची पर्वा न करता.

दुसर्‍या दिवशी मी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो. चौकशीअंती कळले की धावपळीत त्या रिक्षावाल्याला पैसे द्यायचे राहून गेले होते. अचानक एके दिवशी तो रस्त्यात भेटला. त्यानेच वाकून नमस्कार केला. माझ्या प्रकृतीची चौकशी केली. सर्व काही ठीक आहे ना. त्याला मी घरी घेऊन गेलो. पैशाचे विचारताच तो म्हणाला, बाबूसाहेब पैसे कोठे जातात. आज नाही तर उद्या मिळूनच जातील. त्या दिवशी मी नमाज अदा करण्यासाठी निघालो होतो, परंतु तुमची अडचण लक्षात आली. परमात्म्याने सर्वांना सुखी-समाधानी ठेवावे, हीच प्रार्थनेत शक्ती असते ना. त्याने माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतलेही. व्यवहार संपला तरी मानवतेचा व्यवहार कधीच संपणार नव्हता. डोळे पाणावले. अडचणीत सापडलेल्यांसाठी वेळेवर धावून आलेल्याचे महत्त्व कधीही न विसरण्यासारखे असते. असेही अनुभव जीवनाला उभारी देत असतात.