आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि आनंदाश्रू तरळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकर लग्न झाल्याने आणि लगेचच मातृत्वाची चाहूल लागल्याने माझे शिक्षण अपुरे राहिले. शिवाय कुटुंबाची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. पण मी जिद्दीने माझे राहिलेले शिक्षण लगेचच पूर्ण केले. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एकीकडे पूर्ण करताना घरच्या घरी मुलांच्या ट्यूशन्स घेतल्या. मी मुंबईची असल्याने चारचौघींप्रमाणे कर्तृत्व दाखवावे, ही मनोधारणा होती. पण नोकरी करावी तर घराकडे दुर्लक्ष होईल म्हणून टॅलेंट असूनही संधी चालून आल्या तरी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. पण घर सांभाळतानाच माझ्या अंगी असलेली कलाकौशल्ये मात्र प्रयत्नपूर्वक जोपासली. मला लेखनाची आवड होती. विविध वृत्तपत्रांतून, नियतकालिकांमधून लेख प्रसिद्ध झाले. माझा आत्मविश्वासही वाढला. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला. एका कार्यक्रमामध्ये अचूक उत्तरे देऊन सोन्याचे नेकलेस, मोत्यांची अंगठीही जिंकले आहे. विविध पाककला स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यात पुरस्कारही मिळाले. माझ्या या कामगिरीबद्दल, 2009मध्ये राशिचक्रकार शरद उपाध्ये यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देण्यात आला.

हजारोंमध्ये जेव्हा माझे नाव पुकारले गेले तेव्हा मात्र डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. कारण हा पुरस्कार होता माझ्या अस्तित्वाचा, सन्मानाचा, कौशल्याचा व गुणांचा. घर सांभाळून अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता मी माझे छंद, आवड जोपासली. गृहिणी असल्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. मी वेळेचे महत्त्व जाणून स्वत:चा विकास करून माझे अस्तित्व, स्पेस निर्माण केली. कर्तृत्व दाखवण्यासाठी बाहेरच पडले पाहिजे असे नाही; आवड त्याला सवड हे महत्त्वाचे. अंगातील सुप्त कलागुणांना मुक्तपणे वाट मोकळी करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. निराळ्या वाटा धुंडाळण्याचा आनंद मिळतो. वेगळी पाऊलवाट निर्माण करताना स्वत:चा ठसा उमटवण्याची संधी मिळते. त्यात समाधान लाभते ते वेगळेच. माझ्या या वाटचालीत माझ्या आई-वडिलांनी व यजमानांनी मला उत्तम साथ दिली.