आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणाचा अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही काही वर्षांपूर्वी औरंगाबादनजीक गिरनार येथे एका आश्रमात निसर्गोपचार शिबिरासाठी 40 ते 45 जण गेलो होतो. त्यात 10 ते 15 महिलाही होत्या. पहिल्या दिवशी गुरुजींनी अध्यात्म आणि व्यवहार याबाबत एक सुंदर प्रवचन दिले. त्यानंतर एका मोठ्या टोपलीत सर्वांना आपापली पाकिटे, घड्याळे, लॉकेट, चीजवस्तू ठेवायला सांगितल्या. ज्यांना आवश्यकता वाटेल अशांनी एका चिठ्ठीवर टोपलीत ठेवलेल्या ऐवजाची माहिती लिहिण्याची परवानगी देण्यात आली. गुरुजींच्या प्रवचनाचा प्रभाव एवढा होता की, सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू टोपलीत ठेवल्या. आमच्या प्रशिक्षण कालावधीच्या काळात सतत चार दिवस ती मौल्यवान किमती वस्तूंनी भरलेली टोपली सर्वांना दिसेल, अशी दर्शनी भागात ठेवलेली असायची. विशेष म्हणजे जंगलातील त्या आश्रमाला दरवाजाही नव्हता. त्यामुळे 24 तास सर्व काही उघडेच. आजूबाजूच्या स्थानिक लोकांचा वावरही या भागात असायचा. त्या आश्रमाच्या परिसरात अद्याप कधी चोरी झालेली नव्हती, तरी आमचे मौल्यवान सामान समोर टोपलीत उघड्यावर ठेवलेले असल्याने मनातून धास्तावलोच होतो.

चौथ्या दिवशी सायंकाळी आम्हाला टोपलीतील आपापल्या वस्तू घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे आमच्यापैकी प्रत्येकाने ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या, त्या जशा आहे तशाच मिळून आल्या. टोपलीत एवढे किमती सामान असूनही कोणीच त्याला हातही लावला नव्हता. परिसरातील व स्थानिक लोक येथून येताना आणि जाताना आम्हाला दिसायचे; पण आमच्या वस्तू आहे तशाच राहिल्या. सर्व शिबिरार्थींनी आपापल्या वस्तू काढून घेतल्यानंतर टोपलीत 98 रुपये शिल्लक राहिले. ते गुरुजींनी आपल्याकडचेच टाकले होते. ते त्यांनी घेतले. याच किमती वस्तू जर रस्त्यावर टाकल्या असत्या, तर काय झाले असते? पण वातावरणाच्या शुद्ध संस्काराचा काय प्रभाव असतो, मार्गदर्शक गुरूंचे सान्निध्य किती महत्त्वाचे असते, ते या निमित्ताने समजले.