आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही सत्त्वपरीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात, त्यापैकी काही घटना माणसाच्या मनावर कायम कोरून राहतात. माझ्या मित्राच्या पत्नीचे ऐन उमेदीत 12 मे 1993 रोजी निधन झाले. ज्या दिवशी हा दु:खद प्रसंग घडला, त्या दिवशी त्यांच्या मुलीचा इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर होता. घरात असा दु:खद प्रसंग घडला असताना खरे तर ती परीक्षेलाच जाण्यास तयार नव्हती. त्याही स्थितीत माझ्या मित्राने मला बोलावून घेतले आणि खांद्यावर हात ठेवून सांगितले की, तुम्ही माझे विश्वासू मित्र आहात. आईच्या मृत्यूमुळे ती पेपर द्यायला तयार नाही. ती सारखी रडत आहे. मात्र, अशा परिस्थितीत तिचे वर्ष वाया जाईल. ती तर आता काही परत येणार नाही; पण मुलीचे वर्ष मात्र फुकट जाईल, तेव्हा तू तिचे परीक्षेसाठी मन वळव. तेव्हा त्या मुलीला बाजूला बोलावून घेतले आणि तिची समजूत काढत सांगितले की, आईच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी तुझी इच्छा आहे ना! तेव्हा तू परीक्षेला बसले पाहिजे. पेपर संपल्यावर हवे तर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दे. सुदैवाने मी तिची समजूत काढण्यात यशस्वी ठरलो. सकाळचे 9 वाजले होते. पेपर दहा वाजता होता. दारातून आईची अंत्ययात्रा निघत असताना मी तिला स्कूटरवरून परीक्षा हॉलकडे सोडवायला निघालो.

हा प्रसंग हृदयद्रावक होता. तरीही आयुष्याचे महत्त्व माणसाला काय करायला लावते, हेही या निमित्ताने अनुभवायला मिळाले. पेपर सुटल्यानंतर मी तिला परीक्षा हॉलवरून घेऊन आलो. पेपर कसा गेला, असे विचारल्यानंतर ती बरा गेला असे म्हणाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. यथावकाश परीक्षेचा निकाल लागला. ती चांगल्या गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाली. खरे म्हणजे असा प्रसंग कोणावरही येऊ नये. कठीण प्रसंगात तिने दाखवलेले धारिष्ट महत्त्वाचे आहे. ती परीक्षा देण्यास तयार झाली, हे महत्त्वाचे.