आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांची शिकवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या बालपणीचा हा प्रसंग. एके दिवशी आई कामात असल्यामुळे तिने मला शाळेत जाताना डबा दिला नाही. ती म्हणाली, ‘मधल्या सुटीमध्ये घरी ये, मी स्वयंपाक बनवून ठेवते.’ मी मधल्या सुटीत शाळेतून घरी आलो. भरदुपारची वेळ होती. मला अर्ध्या तासात शाळेत परत यायचे होते, म्हणून भर उन्हात पळत पळत घर गाठले. कडकडून भूक लागली होती. घर आणि शाळा बर्‍यापैकी जवळ होती. घरी गेलो, घाईघाईत स्वयंपाकघरात शिरलो. सगळी उलथापालथ केली. कढया रिकाम्या, टोपलीत पोळी-भाकरी काहीच नाही. माझा राग अनावर झाला. आधीच भुकेने जीव कासावीस झाला होता. मी आईवर खूप खूप रागावलो, काही काही बोललो, चिडलो, रडलो. जवळच माझे आजोबा बसले होते. संतापामध्ये मी साठवलेल्या गल्ल्यामधून दोन-तीन रुपये निघाले ते घेऊन पळत पळत शाळेकडे निघालो.

दोन-तीन रुपयांमध्ये काय येणार, हा विचार करता करता सुटी संपली. सायंकाळी घरी आलो. माझ्या खिशात दोन-तीन रुपये तसेच होते. आईने माझ्यासाठी शिळ्या बाजरीच्या भाकरीचा गूळ, तूप टाकून चुरमा करून दिला. माझे आजोबा म्हणाले, ‘अरे, माझी आई मी सव्वा वर्षाचा असताना पंढरपूरच्या दिंडीमध्ये गेली. मलेरियाच्या साथीने तेथेच मरण पावली. मला लहानपणापासून आई म्हणजे काय ते माहीत नाही. काकू, मावशा यांनी माझा सांभाळ केला. ज्याच्याजवळ आई आहे त्याच्याजवळ जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आज तुझ्याजवळ आई आहे, तर तुला तिची किंमत नाही. जा, त्या जननीची माफी माग.’ मला खूप वाईट वाटले. मी ताबडतोब आईची माफी मागितली. आज आईच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करतो आहे. आज आई आहे, परंतु आजोबा... आजोबांच्या आठवणीने मन आजही व्याकूळ होते. नातवावर आजोबांचा फार जीव असतो. अनेक संस्कार त्यांच्याकडूनच आलेले असतात. त्यामुळे माझ्या आजोबांची आठवण कायम राहणार आहे.