आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीवाली उमाबाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज प्रात:काळी दहीवाल्याची ‘दहीऽऽ’ अशी ललकारी ऐकली आणि मी एकदम 30 वर्षे मागे गेलो. आमचा तो नागपूरचा महाल विभागातला वाडा. त्यातलं आमचं एक छोटेखानी घर. त्या घरात आम्ही स्वर्गसुख अनुभवलं. सतत मायेची पखरण करणारी माणसं होती अवतीभोवती. आमच्या वाड्यात काय नव्हतं; सगळंच होतं. आनंद होता, उत्साह होता. अशा आमच्या या चौसोपी वाड्यात बरोबर सकाळी नऊच्या ठोक्याला उमाबाई दहीवाली यायची. ती आल्यावर आम्ही सकाळच्या एवढ्या घाईतही तिच्याभोवती जमा व्हायचो. तिचं ते मातीचं सुबक भांडं, त्यात ते खवल्या-खवल्यांचं आंबट-गोड मधुर दही, ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटायचं. उमाबाई आमच्या भांड्यात ते सुमधुर दही अतिशय सुंदर घाटणीच्या मापाने टाकायची. दही देऊन झाल्यावर ती घराच्या दाराच्या कोपर्‍यात उभ्या-आडव्या रेषा आखून ठेवायची. आम्हाला त्या रेषांचं आकलन कधीच झालं नाही. तो हिशेब फक्त तिलाच कळायचा. कधी कधी ती लोणीही घेऊन यायची. तो मऊ, पांढराशुभ्र लोण्याचा गोळा मटकावताना आम्हाला खूप मजा यायची. उमाबाईच्या दह्याची कढी खूपच अप्रतिम व्हायची.

तिची आठवण काढत आम्ही कढीचे भुरके मारत असू. ती नेहमीच आमच्यासाठी तिच्या शेतावरून बोरं, आवळे, चिंचा आणायची. त्या रानमेव्याला अवीट गोडी असायची. अशी आमची ही उमाबाई आपुलकीचा झरा होती. एक दिवस जरी आली नाही तरी आम्हाला रुखरुख लागायची. आता ती कुठे असेल काहीच माहीत नाही; पण जेव्हा जेव्हा मी दहीवाल्याची ललकारी ऐकते, तेव्हा उमाबाईच्या आठवणीने डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. काही माणसे नात्यातली नसतात पण परिचित असतात. त्यांनी इतका लळा लावलेला असतो की आपुलकीची भावना निर्माण झालेली असते. त्या माणसाची वावरण्याची, त्यांच्या बोलण्याची एक प्रकारे सवय होऊन गेलेली असते. पण एखाद्या पक्ष्याप्रमाणे ती येतात आणि आठवणी मागे ठेवून जातात.