आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांचा असाही भूलभुलय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी माझ्या पत्नीसह एकदा औरंगाबादेतील एका नामवंत दवाखान्यात गेलो होतो. नोंदणी फीस भरल्यानंतर दुपारी तीन वाजता उशिरा नंबर लागला. पत्नीस तपासल्यानंतर डॉक्टरांनी एक विशिष्ट चाचणी करण्यास सांगितले.चाचणीस किती वेळ व पैसे लागतील ते विचारले, तर किमान 2 तास लागतील व एक हजार रु. लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. एमआरआयसारख्या चाचण्या करूनही काही फरक न पडल्याने ही नसांची कुठली तरी चाचणी करण्यास मी होकार दिला.चाचणी झाली. त्यांनी काही औषधी लिहून दिली व परत एक महिन्याने बोलावले. महिन्यानंतर परत तिथे दोघेही गेलो.

डाव्या हाताच्या बोटांना कधी कधी किंचित मुंग्या येत असल्याने आपणही दाखवावे, असा विचार करून मीही नोंदणी केली. सुरुवातीला मला डॉक्टरांनी तपासले व पुन्हा तीच चाचणी करण्यास सांगितले. काही वेळाने त्यांनी मला एका नवीनच झालेल्या दवाखान्याचा पत्ता दिला होता. त्यांनी सांगितले की, मी तेथे 4 वाजता येईल. तोपर्यंत तुम्ही ती चाचणी करा. त्यांनी तसा त्या दवाखान्यात फोनही केला. मी त्यांना विचारले की, ही चाचणी करण्याची सोय तर येथेही आहे. मग तिकडे कशाला पाठवता? तेव्हा त्यांनी सांगितले की, येथे मशीन आहे; पण तंत्रज्ञ नाहीत. ते नोकरी सोडून गेलेले आहेत. मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मशीनजवळ तपासणीसाठी गेलो तर उडालोच. कारण तेथील तंत्रज्ञच येथे हजर होते व चाचणीची फीस होती दीड हजार रुपये! म्हणजे पूर्वीच्या दवाखान्यापेक्षा 500 रु. जास्त. डॉक्टर तेथे आले व मला सांगितले की, आता येथे एक महिन्याने 20 दिवस आधी भेट निश्चित करून यावे. मी विचार केला की, पूर्वीच्या दवाखान्यात भेट निश्चित नसतानाही 3 ते 4 तासांत या डॉक्टरांची भेट होते. मात्र, येथे भेट निश्चित करण्यास सांगतात! यावरून ते डॉक्टर दोन्हीकडे नोकरी करीत असावेत. रुग्णांना किती आर्थिक व मानसिक त्रास होतो याचा विचार न करता केवळ पैसे कमावण्यासाठी काय करू शकतात हे ‘त्या’ डॉक्टरवरून दिसून आले.