आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukt Vyaspith Digambar Kulkarni Article About Awards, Divya Marathi

पुरस्कार विकणे आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरस्कार विकत घेतले जातात आणि त्या विकणार्‍या संस्था अफलातून योजना काढत असतात. काही लोकांच्या दिवाणखान्यात ‘लोकरत्न’, ‘उद्योगरत्न’, ‘समाजरत्न’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित स्मृतिचिन्हे आणि त्यांचे पुरस्कार स्वीकारतानाचे भलेमोठे फोटो लावलेले दिसून येतात. पेपरमध्ये कोणत्या तरी केंद्रीय मंत्र्यांकडून दिल्लीच्या फाइव्ह स्टार हॉटेलात एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची बातमी छापून आलेली असते. या संस्थेचे सामाजिक कार्य काय? कोणत्या क्षेत्रात अशा संस्था उल्लेखनीय कार्य करतात याची माहिती पुरस्कारकर्त्यांनाही नसते. अशा संस्थांना कोणी चौदावे रत्न दाखवत नाही, हे नशीब. अशाच एका पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचे पत्र आले होते. तीन वर्षांपूवी मला महाराष्‍ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार मिळण्यासाठी असलेल्या पात्रतेच्या निकषात बसल्याने तो पुरस्कार मला मिळाला. त्याबद्दल मला साहजिकच आनंद झाला होता. त्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान मला दिल्लीहून एक पत्र आले. त्यात इंदिरा गांधी एक्सलन्स अवॉर्डसाठी निवड झाल्याचे आणि त्यासाठी अभिनंदनाचे पत्र आले. प्रथमदर्शनी कोणालाही होतो तसा मलाही आनंदच झाला; परंतु पत्र पूर्ण वाचल्यानंतर माझे विचारचक्र सुरू झाले. या संस्थेने कोणत्या निकषाच्या आधारे माझी निवड केली. त्यांनी माझे असे कोणते ‘कार्य’ विचारात घेतले. कारण अशी कोणतीही माहिती मी पाठवलेली नव्हती. त्यांनी उद्योग जगतातील कोणत्या तरी डिरेक्टरीतून माझ्या नावाची निवड केल्याचे दिसून आले. गंमत म्हणजे मला त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला बोलावले होते. शिवाय येणे शक्य नसल्यास हा पुरस्कार पोस्टाने/ कुरिअरने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही कळवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तत्पूर्वी त्यांनी पाच आकड्यांत सभासद फीस पाठवण्याची विनंती केलेली होती. त्यानंतरच तो पुरस्कार मला मिळणार होता.