आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कराचार्यांचे स्मरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला देश गणित विषयात जगात अग्रेसर आहे. गणिताची मूळ परंपरा आणि आधुनिक संकल्पनांचा जनक म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, माधवाचार्य, भास्कराचार्य, रामानुजन यांचा उल्लेख करावाच लागेल. २०१४ हे वर्ष थोर गणिती भास्कराचार्य द्वितीय यांचे ९०० वे जयंती वर्ष आहे. आज त्यांची जयंती. अंकगणित, बीजगणित, श्रेढीगणित, त्रिकोणमिती, खगोलशास्त्र, नक्षत्रविज्ञान यातील भास्कराचार्यांचे योगदान एकमेवाद्वितीय आणि सर्वमान्य आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ सिद्धांत शिरोमणी, बीजगणितम््, लीलावती, करणकुतूहल, गोलाध्याय, ब्रह्मतुला, विवरणा हे आजही अनेकांच्या अभ्यासाचे विषय आहेत. अशा थोर गणितज्ञाचा जन्म इ.स. १११४ मध्ये आजच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी येथे झाला. त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहिलेल्या सिद्धांतशिराेमणी या ग्रंथात त्यांच्या जन्मवर्षाचा उल्लेख केला आहे. गणितातील दशमान संख्यांचे स्थान, पूर्णांक-अपूर्णांक, श्रेढी, करणी, एकचल समीकरणे, वर्गसमीकरणे, शून्यासंबंधित क्रिया यावरील विवेचन त्यांच्या ग्रंथात आढळते. ७ जून १९७९ रोजी भारत सरकारने त्यांच्या नावे अवकाशात उपग्रह सोडून त्यांच्या कार्याचा गौरवच केला आहे.

संदेश शालिग्राम सोनवणे, वरूड, ता. जि. औरंगाबाद