जीवन हे विविध अनुभवांनी प्रगल्भ होत असते. काही क्षण असे येतात ज्या क्षणांना हसावे की रडावे, अशी परिस्थिती होते. विविध समस्यांतून मार्ग निघतो; परंतु त्यासाठी माणसाकडे शांतता आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य हवे. श्रद्धा, सबुरी हा मंत्र मनात ठेवून एके दिवशी मी आणि माझी पत्नी आम्ही लहानग्या मुलींसोबत शिर्डीस जाण्यास निघालो. शिर्डीला पोहोचलोही. एका दुकानावर प्रसाद, शाल आदी पूजा साहित्य घेऊन मंदिराकडे दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. अत्यंत आनंदात दर्शन घेऊन बाहेर आलो. प्रसन्न चित्ताने पुढील काही खरेदी करावी आणि परतावे म्हणून मी पत्नीकडे एटीएम कार्ड मागितले. एका कव्हरमधील कार्ड तिने माझ्याकडे दिले. वास्तविक, माझ्याकडील सर्व रोख पैसे संपले होते. तिच्याकडेही पैसे नव्हतेच आणि प्रसाद व तत्सम साहित्याचे पैसे देणे तसेच पुन्हा जाण्यासाठीचे वाहतुकीचे भाडे यासाठी पैसे गरजेचे होते. एटीएमच्या रांगेत उभा असताना मी सहजच कव्हरमधून कार्ड बाहेर काढले आणि मला धक्काच बसला. कारण कव्हरमध्ये चुकून एटीएम कार्डच्या जागी पॅन कार्ड आले होते. दोघेही शांत. अशा वेळेस दोष कुणाचाच नाही. वास्तविक, मी आणि पत्नी दोघांनीही ते कव्हर एटीएम कार्ड सुरक्षित राहावे म्हणून घेतले होते; परंतु तिला अपराधी वाटू लागले. मी धीर देतच म्हणालो, गुरुदेव काहीतरी मार्ग काढतील. पूजा साहित्याच्या दुकानावर सगळी हकिगत सांगितली. महागड्या मोबाइलच्या बदल्यात हवे ते पैसे द्या म्हणालो. माझे हे बोलणे दुकानातील सादिक नावाचा युवक ऐकत होता. तो म्हणाला, ‘साब, वो रहने दो, यह लो हजार रुपये. अगली बार आएंगे तो दे देना.’ दुसर्याच दिवशी त्याचे हजार रुपये आवर्जून जाऊन परत केले. मात्र, परतताना सतत सादिक या नावातील ‘सा’ आणि साईबाबा या अक्षरातील ‘सा’ हे दोन ‘सा’ एकच असल्याचा भास होत होता.