माझी एक मैत्रीण बरीच वर्षे अमेरिकेत राहून, वैद्यकशास्त्रातले प्रावीण्य आणि पदव्या संपादन करून मायदेशी परतली होती. मुलगाही खूप शिकलेला होता आणि मोठ्या गलेलठ्ठ पगारावर नोकरी करत होता. उत्तमपैकी दवाखाना थाटून ती इथे स्थायिक झाल्यासारखी वाटत होती. रुग्णांची तिच्या दवाखान्यात नेहमीच गर्दी असायची. तरीही एक दिवस सकाळीच ती मुलाला घेऊन माझ्याकडे आली आणि मला विचारू लागली की, कोणी चांगल्यापैकी ज्योतिषी ओळखीचा आहे का? दुसर्याच दिवशी मी तिला आणि तिच्या मुलाला घेऊन आमच्या माहितीतल्या ज्योतिष्याकडे नेले. नमस्कार-चमत्कार झाल्यावर तिला ज्योतिष्याशी बोलताना संकोच वाटू नये म्हणून तिला म्हटले, मी बाहेर बसते, पण तिनेच मला आग्रहाने तिच्या शेजारी बसवून घेतले. तिने बोलायला सुरुवात केली : ‘मी आपल्याकडे आलेली आहे ती भविष्य नव्हे तर भूतकाळ जाणून घेण्यासाठी. माझे भविष्य सुरक्षित आहे मला ठाऊक आहे. माझ्या भूतकाळातली एखादी महत्त्वाची घटना आपण मला सांगू शकाल का?’ ज्योतिषी बुचकळ्यांत पडले. पण लगेच सावरून ते म्हणाले, हो, सांगेन की. परंतु आपली ऐकण्याची मानसिक तयारी पाहिजे, कमीत कमी पाचशे रुपये ... !’ मैत्रिणीने होकार देताच त्यांनी बराच वेळ तिच्या हाताचे बहिर्गोल भिंगाने काळजीपूर्वक निरीक्षण केले. थोडा वेळ विचार केला आणि ते माझ्याकडे पाहायला लागले. मी उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना पाहून पुन्हा तिनेच मला आग्रहाने शेजारी बसवून घेतले. मुलाला मात्र तिने जरा बाहेर थांब म्हणून सांगितले. ‘हे पाहा’, ज्योतिषांनी सुरुवात केली ‘आपल्या हस्तरेषेप्रमाणे आपल्या नशिबात संतती योग नाही. तुम्ही ज्याला मुलगा मानता त्याला परदेशातल्या अनाथाश्रमातून आणून मोठा केला, वाढवला... ’ माझी मैत्रीण चटकन उठली, पाचशेची नोट ज्योतिष्यापुढे ठेवली आणि आदराने वाकून नमस्कार करीत बाहेर पडली, ती आजतागायत पुन्हा काही भेटली नाही.