आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा ‘चहा’चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या बालपणी घडलेला हा मजेशीर प्रसंग. मी मुंबईमध्ये प्रभादेवी भागात राहतो. प्रभादेवीमध्ये मराठी भाषक लोक जास्त असल्याने सर्व मराठी सण व सार्वजनिक उत्सव अतिशय उत्साहात व मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. गणपती, गोविंदा, नवरात्र इ. दणक्यात साजरे होतात. या उत्सवांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. आमच्या लहानपणी आजच्याइतका थाट नसला तरी उत्साह मात्र दांडगा असायचा. आजच्या मुलांसारखा ‘पॉकेटमनी’ खिशात नसल्याने व घरातूनही असल्या नसत्या थेरांना प्रोत्साहन नसल्याने एकूणच साधेपणा असायचा. छान छान कपडे किंवा इंपोर्टेड खेळणी वगैरे काहीच नसायचे. बिनखर्चाचे मैदानी खेळ तेवढेच परवडायचे. असेच एका वर्षी आमच्या चाळीतल्या नवरात्रोत्सवामध्ये आम्ही मुलांनी नाटक बसवले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर चाळीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आमची तालीम चालायची. अभ्यासात फारसा रस नसला तरी नाटकाचे पाठांतर आम्ही मनापासून करायचो. शेवटी एकदाचा नाटकाचा दिवस आला. नाटक सुरू झाले. नाटकात चहा पिण्याचा प्रसंग होता. नाटकात काम करणारा राजू चहा पिता पिता संवाद म्हणणार होता. वास्तविक रिकामी कप-बशी घेऊन चहा पिण्याचे ‘नाटक’ करायचे होते. राजूची आजी खूप प्रेमळ होती. आपला नातू व त्याचे मित्र नाटक करतायत म्हणून तिने कौतुकाने आले घातलेला खरोखरचा गरम गरम चहा सर्वांसाठी बनवून आणला व स्टेजवरही चहाचे भरलेले कपच आमच्या हातात आले. चहा इतका गरम व झणझणीत की तो फुंकर मारून पिता पिता राजू डायलॉगच विसरूलागला. आम्हाला त्याची तारांबळ बघून हसू आवरणे कठीण होऊ लागले. शिवाय आमच्या हातातील चहाही संपवणे भाग होते...