आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे अवसान कुठून आले ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटना पंधरा वर्षांपूर्वीची आहे. माझी दोन्ही मुलं सरस्वती भुवन शाळेत शिकत होती. मुलांचा सीटीबसचा पास काढायला मी शहागंजला गेले होते. तिथून औरंगपुºयात आले. मी बसची वाट पाहत बसथांब्यावर उभी होते. शाळा सुटण्याची वेळ होती. मुला-मुलींना घरी जायची घाई झाली होती. जो तो धक्काबुक्की करून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होता. एवढ्या गर्दीत बसमध्ये चढणे मला तरी शक्य नव्हते. त्यामुळे मी 3 ते 4 बसेस सोडून दिल्या. इतक्यात औरंगपुरा ते सिडको बस लागली. मीही बसमध्ये बसण्यास धाव घेतली. रांगेत माझ्यासमोर एक पुरुष होता. त्याच्यापुढे एक शालेय मुलगी बसमध्ये चढत होती. हे गृहस्थ नको तिथे हात लावून त्या मुलीची छेड काढीत होते. ती मुलगी घाबरून, बावरून इकडे-तिकडे बघत होती. हे माझ्या दृष्टीस पडताच, माझ्यात कुठून दैवी शक्ती संचारली माहीत नाही, मी सरळ त्या गृहस्थाच्या थोबाडात लगावली. मागे हो, नाहीतर पोलिसात देईन, एवढे वाक्य म्हणून मी बसमध्ये चढले. आरामात सीटवर बसलेही. मात्र झालेल्या प्रकाराची मला भीती वाटू लागली. नाही नाही ते विचार मनात येऊ लागले. तो गृहस्थ कोण? त्याने माझ्यावर डाव धरून सूड घेतला तर? तो माझ्या पाळतीवर तर नाही! या विचाराने डोक्यात काहूर माजले. विचारांच्या भोवºयात असतानाच रामा हॉटेलचा बसस्टॉप आला आणि मी बसमधून उतरून घराकडे चालायला लागले. दुपारी दीडची वेळ असेल. रस्त्याने चिटपाखरूही नव्हते. अशात मला खूप भीती वाटू लागली. तो गृहस्थ माझ्या मागे तर येणार नाही ? मी मागे बघून पुढे चालायचे. असे करीत करीतच एकदाचे माझे घर आले आणि मला पार हायसे वाटले. तरीही भीतीमुळे मी आठवडाभर सीटीत गेले नाही. आजही मी औरंगपुºयाच्या स्टॉपवर आले की मला ती घटना आठवते. जणू काही काल-परवाच घडलेली गोष्ट आहे. मनात विचार येतो की तेव्हा इतके अवसान कुठून आले?